
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे– महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या जेसीबी फसवणूक प्रकरणात मुख्य आरोपी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांच्यासह चार आरोपींना खेड येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आज या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासी अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणात फिर्यादी प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीवरून शशांक आणि लता हगवणे, योगेश राजेंद्र रासकर, गणेश रमेश पोतले, वैभव मोहन पिंगळे (हे तिघे बोगस बँक एजंट) आणि जेसीबी हस्तांतरणात सहभागी असलेला प्रणव साठे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून जेसीबी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
शशांक आणि लता हगवणे यांच्या सह अन्य आरोपींची पोलिस कोठडी काल संपली होती. आज न्यायालयीन सुनावणीदरम्यान पोलिसांनी आणखी चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी शशांक आणि लता हगवणे यांच्या जामिनासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.