
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न चर्चेत आला आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. यावर आता भाजपा नेत्यांनी यावर भाष्य करताना खोचक टोला लगावला आहे.
जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. जयंत पाटील यांची भेट घेत एक तास चर्चा केली. राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केले आहे. इतकी मोठी संघटना इतका मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका, हे जयंत पाटील यांचे विधान म्हणजे शरद पवारांना सूचक इशारा असून, त्यांनी आता सतर्क राहिले पाहिजे, असा खोचक टोला लगावला. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा पक्षामध्ये आदरच असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सिंचन विभागामध्ये गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे, विदर्भ सिंचन, कोकण खोरे विकास महामंडळाकरिता राज्य सरकार विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम तयार करून आवश्यक त्यास निधी उपलब्ध करून देईल. पंतप्रधान मोदी यांनी नदीजोड प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प अधिक गतीमान होतील. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.(स्त्रोत -लोकमत)