गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ यांना यंदा पद्मश्री जाहीर झाला आहे. मराठी कलाविश्वासाठी ही गौरवाची बाब आहे.
अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी सरकारला टोलाही लगावला आहे. “पद्मश्री अशोक सराफ…अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी. ही पदवी मिळायला तसा उशीरच झालाय. पण देर आए दुरूस्त आए!! मनापासून अभिनंदन”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गेल्या वर्षीच अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आलं होतं. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ही खरोखरंच आनंदाची बाब आहे. अशोक सराफ यांच्या शिवाय कॅलिग्राफी मास्टर अच्युत पालव, गायक अरिजीत सिंह यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने ‘मामा’अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म 1947 साली मुंबईतच झाला. 1969 पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ‘आयत्या घरात घरोबा’,’अशी ही बनवाबनवी’,’बाळाचे बाप ब्रह्मचारी’,’भूताचा भाऊ’,’धुमधडाका’सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. ‘सिंघम’ मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’ या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या.