
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | आंतरराष्ट्रीय :
मध्यपूर्व पुन्हा पेटली आहे. इस्रायलने अवघ्या ७२ तासांत तब्बल ६ इस्लामिक देशांवर हल्ले करून जगाला हादरवून सोडलं आहे. गाझा, सीरिया, लेबनान, कतार, यमन आणि ट्यूनिशिया या देशांवर इस्रायलच्या सैन्याने केलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने या हल्ल्यांना “दहशतवादविरोधी मोहिम” ठरवून समर्थन दिलं आहे, मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे हमासच्या वरिष्ठ नेत्यांवर हवाई हल्ला केला. या कारवाईत हमास प्रमुख खलील अल हय्या यांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात अल हय्याचा मुलगा, त्यांचा कार्यालयीन संचालक, सुरक्षा रक्षक आणि एक अधिकारी अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला अशावेळी झाला जेव्हा हमासचे नेते अमेरिकेसोबत युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करत होते. परिणामी हमासने युद्धविरामाचा प्रस्ताव नाकारला असून परिस्थिती अधिक चिघळली आहे.
सोमवारी इस्रायलने पूर्व लेबनानमधील बेका आणि हरमेल जिल्ह्यात हवाई हल्ले केले. यात हिजबुल्लाहच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि किमान पाच जण ठार झाले. नोव्हेंबर २०२४ मध्ये इस्रायल–लेबनानमध्ये युद्धविराम झाला होता. तरीदेखील इस्रायल सातत्याने दक्षिण लेबनानमधील हिजबुल्लाहच्या तळांवर कारवाया करत आहे.
सीरियामध्ये सोमवारी इस्रायलने एअरफोर्स बेस व लष्करी तळांवर बॉम्बफेक केली. यामध्ये मोठी जीवितहानी झाली नसल्याचं सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने सांगितलं. तथापि, गेल्या काही महिन्यांत इस्रायलने सीरियावर ८६ हवाई हल्ले आणि ११ जमिनी हल्ले केले आहेत. यात ६१ जणांचा मृत्यू झाला असून १३१ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सीरिया आणि इस्रायलमधील १९७४ च्या तहानंतरही या संघर्षात वाढ होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
सोमवारी रात्री इस्रायली ड्रोनने ट्युनिशियातील एका बंदरावर कारवाई केली. फॅमिली बोटवर बॉम्बफेक करण्यात आली, मात्र सुदैवाने प्रवासी बचावले. याशिवाय मंगळवारी ब्रिटिश जहाजावरही इस्रायली ड्रोन हल्ला झाल्याची माहिती आहे.
यमनची राजधानी सना येथे मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा इस्रायलने बॉम्बफेक केली. हुती बंडखोरांचे ठिकाण टार्गेट करण्यात आले. याआधी २८ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात हुती पंतप्रधान अहमद अल रहावी यांच्यासह १० जण ठार झाले होते.
इस्रायलने सोमवारी गाझावर मोठा हल्ला केला. या कारवाईत १५० जण ठार झाले तर ५४० हून अधिक जखमी झाले आहेत. गाझाचा जवळपास ७५ टक्के भाग इस्रायलच्या नियंत्रणाखाली गेल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारमधील हल्ल्याचं समर्थन करताना या कारवाईची तुलना अमेरिकेवरील ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेल्या प्रतिसादाशी केली. “जे अमेरिका त्या वेळी केलं, तेच आम्ही आज केलं आहे,” असं नेतन्याहू यांनी म्हटलं.
इस्रायलच्या या तुफानी कारवाईवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाविरोधात इस्रायलने केलेली भूमिका मान्य असली तरी अशा व्यापक हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव धोकादायक पातळीवर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.