
माणदेश एक्सप्रेस न्युज | इस्लामपूर :
इस्लामपूरजवळील कारखाना परिसरात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात साखराळे गावातील महेश राजाराम जाधव (वय 30) यांचा मृत्यू झाला, तर बोरगाव येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
शनिवारी रात्री सुमारे सातच्या सुमारास इस्लामपूर-ताकारी मार्गावरील कारखाना परिसरात हा अपघात झाला. नेहमीप्रमाणे या मार्गावर वर्दळ सुरू होती. अचानक दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू व दोघे जखमी अशी दुर्दैवी घटना घडली.
महेश राजाराम जाधव (रा. साखराळे) हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 10 सीके 4324) बोरगावच्या दिशेने जात होते. दुसऱ्या बाजूने अथर्व संदीप पाटील व युवराज विनायक पाटील (दोघे रा. बोरगाव) हे दोघे दुचाकीवरून (एमएच 10 ईडी 2937) येत होते. कारखाना परिसरात आल्यानंतर दोन्ही दुचाकींची भीषण समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोराची होती की महेश जाधव रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अथर्व संदीप पाटील व युवराज विनायक पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच गर्दी झाली. नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमी युवराज पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
महेश जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. घरचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात मृत्यू झाल्याने साखराळे गावात तसेच इस्लामपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे स्वरूप अरुंद असून, रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना नसल्याने अपघाताची शक्यता वाढते, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. संबंधित ठिकाणी वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.