
माणदेश एक्सप्रेस न्यूज | इस्लामपूर :
इस्लामपूर शहरात रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरविण्यात आलेल्या आठवडा बाजारातील भाजीपाला, फळे आणि किरकोळ माल वाहून गेल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे गटारी तुंबल्या आणि पाण्याचा मोठा लोट रस्त्यावर उतरला. या प्रवाहात टोमॅटो, दोडका, भेंडी, वांगी यांसारख्या भाज्यांसह शेतकऱ्यांचा मोठा माल वाहून गेला.
इस्लामपूर पालिका प्रशासनाकडून मुख्य भाजी मार्केटच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे मागील महिनाभरापासून गुरुवार आणि रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर, अंबिका आणि संभूआप्पा-बुवाफन देवालय परिसरातील रस्त्यावर हलवण्यात आला होता. मात्र, हा परिसर नैसर्गिक उतारावर असल्याने आझाद चौक, डांगे चौक, तहसील कचेरी चौक अशा विविध भागांतून येणारे पाणी थेट या भागाकडे वाहते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हीच स्थिती शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी संकट ठरली.
रविवारी दुपारी बाजाराची मांडणी सुरू असतानाच पाऊस कोसळला. काही मिनिटांतच रस्त्यावरील गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून ओसंडले. या पाण्याच्या प्रवाहात भाजीपाला, फळे, धान्य व किराणा साहित्य वाहून गेले. शेतकरी आणि विक्रेते आपल्या मालाचे रक्षण करण्यासाठी जीव तोड प्रयत्न करत होते; परंतु अनेकांचा माल पाण्यात वाहून गेला. “सकाळपासून बाजारासाठी तयारी केली, पण क्षणार्धात सर्व नष्ट झाले,” अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व व्यापाऱ्यांकडून उमटल्या.
या घटनानंतर संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपला माल उचलून थेट तहसील कार्यालयाजवळील मूळ जागी ठाण मांडले. “पालिका प्रशासनाने दिलेल्या तात्पुरत्या जागेत बाजार घेण्यापेक्षा मूळची जागा अधिक सुरक्षित होती. आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण घटनेवर इस्लामपूर पालिका प्रशासनाकडे कोणतेच ठोस उत्तर नव्हते. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही मदत वा उपाययोजना तत्काळ जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचा संताप अधिकच वाढला असून येत्या आठवड्यातही हाच बाजार तात्पुरत्या जागी भरवला जाणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


