
माणदेश एक्सप्रेस न्यूज|नागपूर
जगभरात सध्या अस्थिरतेचं वातावरण असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसऱ्या महायुद्धाचा संभाव्य धोका व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. नागपूरमध्ये रविवारी (६ जुलै) आयोजित ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी जागतिक घडामोडींवर परखड भाष्य करत, जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, असा स्पष्ट इशारा दिला.
संवाद-प्रेमाचा अभाव, हुकूमशाही वृत्तीमुळे संकट
“आज जगात सुसंवाद, प्रेम, सौहार्द, सहिष्णुता यांचा अभाव निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवर काही महासत्तांच्या हुकूमशाही राजवटीमुळे मानवी मूल्यांचा र्हास होत चालला आहे. युद्धमंत्री आणि हुकूमशाही वृत्तीच्या नेत्यांच्या निर्णयांमुळे जग एका विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे,” असं गडकरी यांनी ठामपणे नमूद केलं.
आधुनिक युद्धाचं स्वरूप अधिक भयावह
गडकरी म्हणाले, “आजची युद्धं ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित झाली आहेत. टँक आणि लढाऊ विमानांसारखी पारंपरिक शस्त्रं मागे पडत असून, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा वापर वाढला आहे. दुर्दैवाने, आता मानवी वस्त्यांवरही क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. ही स्थिती मानवतेच्या अस्तित्वावरचं मोठं संकट ठरू शकते.”
‘भारत बुद्धाचा देश, पण धोरणांमध्ये गांभीर्य आवश्यक’
“भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे. इथेच सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला गेला. पण आज जगातील घटनांकडे पाहता, भारतानेही जागतिक धोरणांची पुनर्मांडणी गांभीर्याने करायला हवी,” असा सल्लाही त्यांनी दिला.
‘पोट रिकामं तर तत्वज्ञान व्यर्थ’; देशातील विषमतेवरही चिंता
जागतिक परिस्थितीबरोबरच भारतातील सामाजिक-आर्थिक विषमतेवरही गडकरी यांनी परखड मत मांडलं. “आज देशात गरीब अधिक गरीब होत आहेत आणि काही श्रीमंतांच्या हातात संपत्ती केंद्रीत होत चालली आहे. संपत्तीचं विकेंद्रीकरण अत्यावश्यक आहे. शेती, उद्योग, करप्रणाली आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी यामध्ये समतोल हवा. पोट रिकामं असेल, तर कुणालाही तत्वज्ञान शिकवता येत नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं.
जागतिक चर्चेची गरज
गडकरींच्या या विधानांनी जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या अस्थिरतेची झलक स्पष्ट केली आहे. त्यांनी जागतिक नेत्यांना इशारा देत सांगितलं की, “युद्ध आणि हुकूमशाही यांना आळा घालण्यासाठी, जागतिक समुदायाने एकत्र येऊन संवाद साधणे गरजेचे आहे. जर वेळेवर पावले उचलली नाहीत, तर मानवतेचं भवितव्य धोक्यात येईल.”