
माणदेश एक्सप्रेस न्यूज विशेष प्रतिनिधी|मुंबई
राज्याच्या राजकारणात सध्या एकीकडे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील हालचाली, ठाकरे-राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठी, विरोधी पक्षातील नव्या युतींचा रंगत चाललेला पट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी आहेत का? असा चर्चेचा विषय सध्या राजकीय वर्तुळात तापला आहे. या चर्चेचं केंद्रबिंदू बनले आहेत – आ. रोहित पवार.
जयंत पाटीलांच्या राजीनाम्यानंतर बदलाची हवा
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शरद पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीबाबत कार्यकर्त्यांत नाराजीचे सूर उमटत होते. अनेक बैठकीत नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, संघटना नव्याने उभी करावी, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
या रिक्त पदावर विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली, तर दुसरीकडे आ. रोहित पवार यांना प्रदेश सरचिटणीसपद आणि सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रोहित पवार यांच्या वाढत्या सक्रीयतेमुळेच शिंदे हे फक्त औपचारिक प्रदेशाध्यक्ष ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोहित पवार मैदानात, शशिकांत शिंदे पडद्याआड?
नुकत्याच काही महिन्यांत रोहित पवार हे विविध मुद्यांवर राज्य सरकारला थेट आणि आक्रमक पद्धतीने घेरताना दिसले आहेत. त्यांची उपस्थिती प्रेस कॉन्फरन्स, आंदोलने, सोशल मीडिया, विधानभवनातल्या चर्चांमध्ये स्पष्ट दिसून येते.
त्यांनी ज्या प्रकरणांवर आक्रमक भूमिका घेतली, त्यात—
आ. संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा मुद्दा,
मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील बॅगचा प्रश्न,
बीड जिल्ह्यातील खून प्रकरण,
शिक्षकांच्या आंदोलनावर केलेली परखड प्रतिक्रिया,
माणिकराव कोकाटे यांचा ‘पत्त्यांचा व्हिडीओ’,
दादरचा कबुतरखाना वाद,
यातून त्यांची राजकीय व्यूहबुद्धी आणि पक्षाला ‘स्ट्रीट लेव्हल’वर मजबूत करण्याची धडपड दिसून आली. या साऱ्या घडामोडीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची उपस्थिती मात्र अत्यल्प राहिल्याचं चित्र आहे.
कार्यकर्त्यांत संभ्रम : खरा नेतृत्वकर्ता कोण?
पक्षाच्या मध्यम व कनिष्ठ पातळीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण आहे. वरिष्ठ पातळीवर शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण प्रत्यक्ष नेतृत्व आणि पक्षाच्या आंदोलनात्मक आणि धोरणात्मक लढ्याचं प्रतिनिधीत्व रोहित पवार करत आहेत. त्यामुळे, शिंदे हे केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष आहेत का?, हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जातो आहे.
आरती साठे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती आणि रोहित पवार यांचा निषेध
याच राजकीय पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी झालेली नियुक्ती हे आणखी एक वादग्रस्त प्रकरण ठरले. रोहित पवार यांनी या नियुक्तीवर थेट आक्षेप घेत, सत्ताधाऱ्यांनी राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना स्वायत्त संस्थांमध्ये नेमून संविधानिक संस्थांवर गदा आणली जात असल्याचा गंभीर आरोप केला.
त्यांच्या मते, “ज्यांनी सतत सत्ताधाऱ्यांची बाजू मांडली, त्यांनाच न्यायव्यवस्थेत संधी दिली जात असेल, तर सामान्य जनतेच्या न्यायाविषयीच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील?“
पक्षांतर्गत नेतृत्व संघर्षाची नांदी?
राज्याच्या सत्तेपासून दूर असलेल्या आणि पक्ष फोडीच्या धक्क्यांतून सावरत असलेल्या शरद पवार गटात युवा विरुद्ध ज्येष्ठ नेत्यांचा संघर्ष भविष्यात उघड होण्याची चिन्हं दिसत आहेत. एकीकडे विचार आणि आक्रमकतेने पुढे येणारा रोहित पवार, तर दुसरीकडे संयमी, परंपरागत संघटन नेतृत्व असलेले शशिकांत शिंदे – या दोन ध्रुवांमध्ये शक्ती संतुलन राखणं पक्षासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.