
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाल्यानंतर, राज्याच्या राजकारणात नवीन घडामोडींची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलने तब्बल १४ जागा जिंकल्या, तर भाजप नेते आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलने ७ जागा मिळवल्या. मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधान आलं असून यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ठळक भूमिका मांडली आहे.
“आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे…”
फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले,
“एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही कुणाला. आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते. विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना भेटायला गेले, तर त्यात गैरकायदेशीर किंवा अयोग्य काय आहे? राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकवेळा भेटले आहेत. गणपतीचे दिवस आहेत. कदाचित गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील किंवा राज्यातील काही तातडीचे विषय चर्चेला आले असतील. त्यामुळे एवढा गाजावाजा करण्यासारखे काही नाही.”
“कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे…”
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या चर्चेबाबत काय नेमके बोलणे झाले असावे, असा सवाल उपस्थित करण्यात आला असता राऊत थोड्या मिश्कील अंदाजात म्हणाले,
“कशाला सांगू? आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेते भेटत असतात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे ही काही गुन्हा नाही. आम्हीही अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. दोन प्रमुख नेते भेटत आहेत. यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे मनसे अध्यक्ष आहेत. त्या भेटीत काय झाले याचे उत्तर त्यांनीच द्यावे. पण राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता, ते या भेटीसंदर्भात उघडपणे आणि स्पष्ट बोलतील.”
“मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे असतात”
दोन्ही ठाकरे बंधूंची एकी, त्याच वेळी भाजपशी वाढता संवाद यामुळे जनतेत संभ्रम पसरतो का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले,
“राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. लक्षात घ्या, मुख्यमंत्री हा केवळ एखाद्या पक्षाचा किंवा गटाचा नेता नसतो. मुख्यमंत्री म्हणजे ११ कोटी जनतेचा प्रतिनिधी. उद्या माझ्या पक्षाचे, उद्धव ठाकरे यांचे किंवा कोणत्याही नेत्याचे सामाजिक, राजकीय काम असेल, तर मुख्यमंत्री भेटायला हवेतच. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक भाग आहे. त्यामुळे त्यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.”
राजकीय समीकरणांना उधाण
बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळाल्याने त्यांच्या राजकीय शक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे बदलतील का, हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.