
Side Effects Of Drinking Water From Copper Jug: पाणी हे जीवन आहे. आपल्या शरीरातही 75 टक्के पाणी असते. शरीरात पाणी कमी झाले तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळं दिवसभरात जास्तीत जास्त तीन लीटर पाणी प्यायलाच हवे. शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. पाण्यामुळं अनेक आजारांवर मात करणेही शक्य होते. पाणी लघवी आणि घाममार्फत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. आयुर्वेदात पाण्याला अमृताचा दर्जा दिला आहे. तसंच, आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यदायी मानले जाते. पण तांब्याच्या भांड्यातील पाणी दररोज प्यायला हवं का? याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात.
आयुर्वेदानुसार तांब्याचं पाणी रोज प्यायचं असलं तरी ते काही प्रमाणात आणि काळजीपूर्वक प्यावं. म्हणजे त्याचे शरीरावर सौम्य परिणाम होऊन फायदेदेखील मिळतात. तसंच, अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळं त्रासदेखील होणार नाही. त्यामुळं तांब्याचे पाणी कधी व किती प्यावं, हे जाणून घेऊयात.
तांब्याचे पाणी रोज उपाशीपोटी 1 ग्लास प्यायचे असतं. त्यामुळं पाचन सुधारते, शरीर डिटॉक्स होते. तसंच, रोगप्रतिराक शक्तीदेखील वाढते. काही जण दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात, पण असे करू नये. पाणी पिण्याची ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण शरीरात अतिप्रमाणात कॉपर जाऊ शकते.
1-2 महिने रोज तांब्यातून पाणी प्यायल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यांचा ब्रेक घ्यावा. यामुळं शरीरात कॉपरचा अतिरिक्त साठा टाळता येतो. जर आहारात आधीच भरपूर कॉपर असलेले पदार्थ असतील तर सतत तांब्याचे पाणी घेणे टाळावं. 15 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा तांब्याचे पाणी पिण्यास सुरुवात करा. या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.
तांब्याचं पाणी कसं प्यावं?
तांब्याचं भांडं स्वच्छ करुन रात्री पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ते पाणी प्या. तसंच, दिवसातून 1-2 ग्लासत पाणी प्या. जास्त पाणी पिणे टाळावं.
तांब्याच्या पाण्याचे फायदे?
तांब्याचे पाणी शरीरातील पित्त आणि वात संतुलित करतं. ज्यामुळं पाचन सुधारते.
हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते
तांब्यात अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
या पाण्यामुळं त्वचेसंबंधी समस्या जसे की पुरळ, डाग कमी होण्यास मदत होते.
तांब्याच्या पाणी अँटी मायक्रोबियल गुणधर्म जंतूंना नष्ट करतात.


