१५० कोटींच्या जमिनीचा हिबानामा प्रकरणाचा तपास सुरू; संदीपान भुमरे यांच्या चालकावर संशयाची सुई

0
45

माणदेश एक्सप्रेस न्यूज, औरंगाबाद 

शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला तब्बल १५० कोटी रुपयांची जमीन हिबानाम्याद्वारे मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, प्रकरणाचा तपास आता महसूल विभागासोबतच आर्थिक गुन्हे शाखाही करत आहे.

चालक जावेद रसूल शेख याच्या नावावर औरंगाबादमधील जालना रोड परिसरातील १२ एकर जमीन हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील सदस्याने हिबानामा स्वरूपात दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या जमिनीची बाजारभावाने किंमत सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही रक्कम इतक्या सहजतेने आणि अनौपचारिक स्वरूपात हस्तांतरण झाल्याने संशयाचे मळभ दाटले आहे.

यासंदर्भात परभणीचे वकील मुजाहीद खान यांनी तक्रार दाखल करत भुमरे व त्यांच्या आमदार पुत्राने या व्यवहारात सहभाग घेतल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, “हिबानामा” म्हणजे बक्षीसपत्र केवळ रक्ताच्या नात्यात दिला जाऊ शकतो. मात्र जावेद शेख आणि सालारजंग कुटुंबातील व्यक्ती यांच्यात कोणताही नातेसंबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, दोघंही इस्लाममधील वेगवेगळ्या पंथांचे असल्याने धार्मिकदृष्ट्याही हा व्यवहार वैध नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या तक्रारीचा गंभीरपणे विचार करण्यात आला असून अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यात काही गडबड असल्यास ती उघड केली जाईल.”

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने जावेद शेख याला चौकशीसाठी बोलावून त्याचे आयकर विवरणपत्र, उत्पन्नाचे स्रोत, आणि जमीन कशा आधारावर मिळाली याबाबत माहिती मागवली आहे. तसेच सालारजंग कुटुंबीयांनाही यासंदर्भात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संदीपान भुमरे यांनी मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, “ही जमीन चालकाच्या नावावर असून हिबानामा हा कायदेशीर कागदपत्र आहे. चौकशीसाठी सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.”

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून महसूल व आर्थिक गुन्हे शाखा विभागाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर यात गैरव्यवहार आढळून आला, तर याचा फटका राजकीय पातळीवरही बसू शकतो, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here