
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | शिराळा :
तालुक्यातील इंगरूळ येथील श्री शिवशंकर विद्यालयाच्या प्रांगणात जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेला दुर्मिळ ‘ॲटलस मॉथ’ आढळून आल्यानं परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. या पतंगाच्या पंखांच्या टोकांवर हुबेहूब नागाच्या तोंडासारखी दिसणारी नैसर्गिक रचना असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं.
या पतंगाचा शोध विद्यालयातील श्रेयस तमुंगडे या विद्यार्थ्याला लागला. तब्बल १२ इंच आकाराचा हा पतंग दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेच्या आवारातील झाडाच्या फांदीवर विसावला होता. शिराळा तालुक्याची ओळख असलेल्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या पतंगाच्या पंखांवर नागाचे चित्र दिसल्याने हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.
या वेळी अनेकांनी फोटो, व्हिडिओ काढून हा अद्भुत क्षण टिपला. काहींनी गुगलवर शोध घेतल्यावर हा दुर्मिळ पतंग ‘ॲटलस मॉथ’ असल्याचे स्पष्ट झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. ए. पाटील आणि एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना या पतंगाबाबत माहिती दिली.
यानंतर पांडुरंग नाझरे यांनी या पतंगाला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात नेले. वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि मोहन सुतार यांनी त्याची तपासणी करून हा दुर्मिळ जीव पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडला.
काय आहे ‘ॲटलस मॉथ’?
जगातील सर्वात मोठा पतंग : ‘ॲटलस मॉथ’ हा सर्वात मोठ्या पतंगांमध्ये गणला जातो. याची पंखांची रुंदी १० ते १२ इंचांपर्यंत असते.
विशेष रंगसंगती : याचा रंग बदामी-तपकिरी, किंचित लालसर तर पंखांवर नकाशासारखे पांढरे ठिपके असतात.
पचनसंस्था नसते : या पतंगाला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट अवस्थेतच तो मोठ्या प्रमाणात अन्न साठवतो. त्यामुळे पतंग अवस्थेत त्याचे आयुष्य फक्त ५ ते ७ दिवसांचे असते. या काळात तो केवळ अंडी घालून वंशवृद्धी करतो.
निशाचर पतंग : रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतो.
दक्षिण-पूर्व आशियात आढळणारा : हा दुर्मिळ जीव प्रामुख्याने भारतासह दक्षिण-पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळतो.
अंडी व अळी : मादी पतंग एकावेळी १०० ते २०० अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी ३५ ते ४० दिवस पाने खाते आणि नंतर कोश अवस्थेत जाते. कोशातून पतंग बाहेर पडल्यावर त्याचा जीवनक्रम सुरू होतो.
इंगरूळमध्ये आढळलेल्या या पतंगामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि आनंदाची लाट उसळली. शाळेतील मुलांसाठी हा निसर्गशास्त्राचा जिवंत धडा ठरला. नागपंचमीसारख्या सणाच्या वातावरणात नागाच्या आकृतीसारखी रचना असलेला पतंग आढळल्याने अनेकांनी याला निसर्गाची अनोखी देणगी मानली.