
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे केस पांढरे होण्याची समस्या सर्व वयोगटांत वाढत आहे. अल्पवयीन मुला-मुलींमध्येही केस पांढरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अशावेळी केस काळे करण्यासाठी महागडे हेअर डाई वापरले जातात. मात्र हे केमिकलयुक्त रंग केसांचे अधिक नुकसान करतात, केस गळणे, कोरडेपणा आणि डोक्याच्या त्वचेवर दुष्परिणाम घडवतात. याला पर्याय म्हणून आयुर्वेदात सांगितलेला इंडिगो पानांचा उपाय आज चर्चेत आला आहे.
इंडिगोचे औषधी गुणधर्म
आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर इंडिगो पावडरचा उपयोग करून केस पांढरेपासून काळे करण्याचा उपाय सांगितला आहे. इंडिगो ही वनस्पती भारतभर आढळणारी असून तिला “निळेबंड” किंवा ब्लू म्यूटिनी म्हणूनही ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा अॅरेक्टा असे आहे.
डॉ. जैदी यांच्या मते, इंडिगो पूर्णतः नैसर्गिक आहे. यात अमोनिया, सल्फेट किंवा पॅराबेनसारखे हानिकारक रसायन नसल्याने केसांना कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट, इंडिगो पावडरनं केसांना रंग येतो, केस दाट, मजबूत व नैसर्गिकरीत्या चमकदार दिसतात. नियमित वापरल्यास कोंड्याची समस्या कमी होते आणि डोक्याची त्वचाही निरोगी राहते.
कसा कराल वापर?
प्रथम केस माइल्ड शाम्पूनं धुऊन कोरडे करून घ्या.
काचेच्या किंवा चीनी मातीच्या वाटीत इंडिगो पावडर घेऊन त्यात पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा.
हातांना ग्लोव्हज घालून तयार पेस्ट केसांवर व्यवस्थित लावा.
शॉवर कॅप घालून पेस्ट 30 मिनिटं ते 1 तास केसांवर ठेवा.
नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून शाम्पू वापरा.
डॉ. जैदी यांच्या मते, या प्रक्रियेनंतर मिळालेला रंग साधारण 4 ते 6 आठवडे टिकतो. केसांवर हा रंग जास्त काळ टिकावा यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा खोबऱ्याच्या किंवा जोजोबा तेलाने डोक्याची मालिश करणे फायदेशीर ठरते.
आयुर्वेदिक उपायाने नैसर्गिक सौंदर्य
केस पांढरे होणं थांबवणे हा मोठा प्रश्न असला, तरी इंडिगो पावडरचा उपयोग हा नक्कीच सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. महागडे डाई, केमिकलयुक्त रंग यांच्या वापरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपाय जनसामान्यांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत.