थायलंडमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला…

0
142

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | नागपूर
कामठी येथील अवघ्या १५ वर्षांची तोशी अनिल कोटांगळे हिने थायलंडच्या पटाया शहरात झालेल्या ‘प्राईड ऑफ इंडिया इंटरनॅशनल’ स्पर्धेत ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. आशिया खंडातील २५ देशांतील स्पर्धकांमध्ये तोशीने भारताचे प्रतिनिधित्व करत विजेतेपद मिळवले आहे.

 

तोशीने याआधी ‘मिस विदर्भ’, ‘मिस महाराष्ट्र’, तसेच दिल्लीतील ‘मिस टीन इंडिया २०२४’ स्पर्धा जिंकून आपली चमक दाखवली होती. आता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या जोरावर यश संपादन केले आहे.२०१० मध्ये जन्मलेली तोशी सध्या मेरी पुसपीन अकादमी, कामठी रोड येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आयसीएसई बोर्डात शिकणारी ही विद्यार्थिनी अभ्यासातही तितकीच हुशार आहे.

 

तोशीने मुख्य फेरीत विविध देशांतील आणि भारतातीलही अनेक अनुभवी मॉडेल्सना मागे टाकत मुकुट जिंकला. विजयानंतर ती म्हणाली, “माझं स्वप्न आहे की, उच्च शिक्षण घेऊन मॉडेलिंग क्षेत्रात भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावायचं आहे.” आपल्या यशाचे श्रेय तिने आई हर्षल, वडील अनिल, भाऊ श्लेष, आजोबा विठोबाजी आणि आजी हेमलता यांना दिले आहे.

 

तोशीच्या या मोठ्या यशाबद्दल आ. डॉ. नितीन राऊत, सुमेधा राऊत, ॲड. अनिल ठाकरे, निर्मला भागवत यादव, वंदना नरेशसिंग ठाकूर, सुप्रिया मसराम, प्राची बागडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि चाहत्यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे. स्थानिक पातळीवर मोठा अभिमान निर्माण करणाऱ्या तोशीच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here