
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व ब्राझीलवर लावलेले तब्बल ५० टक्के टॅरिफचे हत्यार भारतावर फारसा परिणाम करू शकले नाही, उलट अमेरिकेलाच मोठा आर्थिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे भारतावर दुप्पट म्हणजे ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावूनही भारतीय निर्यात वाढली आहे आणि व्यापारातील तोटा घटल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ऑगस्ट महिन्यात भारताचा व्यापार तुटीचा तोटा कमी होऊन 26.49 अब्ज डॉलरवर आला.
जुलै महिन्यात ही तूट 27.35 अब्ज डॉलर इतकी होती.
अर्थतज्ज्ञांनी ऑगस्टमध्ये 24.8 अब्ज डॉलरच्या तुटीचा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्ष आकडा अपेक्षेपेक्षा चांगला राहिला.
ऑगस्ट महिन्यात आयात 10.1% घसरून 61.59 अब्ज डॉलरवर आली.
त्याच वेळी निर्यात 6.7% वाढून 35.1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली.
ही वाढ आणि घसरण यावेळी झाली, जेव्हा अमेरिकेने ७ ऑगस्टला प्रथम २५ टक्के आणि अवघ्या वीस दिवसांत एकूण ५० टक्के टॅरिफ लादले होते.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारताने अमेरिकेत तब्बल 40.39 अब्ज डॉलरची निर्यात केली.
भारत हा अमेरिकेच्या मोठ्या पुरवठादार देशांपैकी एक असून, टॅरिफ असूनही अमेरिकेतील बाजारपेठ भारतीय वस्तूंवर अवलंबून राहिली.
उलटपक्षी, अमेरिकेत टॅरिफमुळे वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आणि महागाईचा फटका थेट ग्राहकांना बसला.
भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.
रशियाने भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. “भारतीय वस्तूंना आमच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी मिळेल,” असे रशियाने स्पष्ट केले.
जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला थेट सांगितले – “खरेदी करायची नसेल तर नका करा, पण भारत दबावाखाली झुकणार नाही.”
या ठाम भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढला असून अनेक देश भारताच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो, मात्र त्याचा दीर्घकालीन परिणाम भारतावर फारसा होणार नाही. कारण –
भारताने व्यापाराचे मार्ग फक्त अमेरिकेपुरते मर्यादित ठेवलेले नाहीत.
रशिया, आशियाई देश, आफ्रिकन बाजारपेठा आणि युरोपमध्ये भारतीय वस्तूंना मोठी मागणी आहे.
पेट्रोलियम, औषधे, टेक्सटाईल्स आणि आयटी सेवा या क्षेत्रांत भारताचे बळ टिकून आहे.
अमेरिकेचे टॅरिफ हत्यार भारतावर अजिबात परिणाम करू शकले नाही. उलट, भारताने व्यापारातील तूट कमी करून निर्यात वाढवली आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत महागाई वाढल्याने ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका भारतापेक्षा अमेरिकेलाच बसला आहे.
भारताने घेतलेली ठाम भूमिका, रशिया व इतर देशांचा मिळालेला पाठिंबा आणि निर्यातीत झालेली वाढ हे घटक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरत आहेत.