पुणे महावितरणच्या परिमंडळ महसुलात वाढ

0
73

माणदेश एक्सप्रेस/पुणे : गेल्या दोन वर्षांत महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये वीजबिलांचे अचूक बिलिंग, विविध उपाययोजनांनी वीजहानीमध्ये घट आणि विक्रमी ४ लाख ३४ हजार नवीन वीज जोडण्यांमुळे वार्षिक महसुलात ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. वार्षिक महसूल २१ हजार २८० कोटी रुपयांवर गेला आहे. तसेच चालू वीजबिल वसुलीची वार्षिक कार्यक्षमता १०० टक्के झाली आहे. परिमंडळाने छतावरील सौरप्रकल्पांना गती देत राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅटची स्थापित क्षमता निर्माण केली आहे.

 

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी पुणे परिमंडळाचा वार्षिक आढावा नुकताच घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, संजीव नेहेते, अनिल घोगरे, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत व शीतल निकम उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडळामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेवून विशेष प्रयत्न व उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण ०.७३ टक्क्यांनी वाढले आहे.

 

 

तर सरासरी वीजबिलांच्या प्रमाणात ०.९३ टक्क्यांनी घट झाली आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३४ हजार ८३६ विक्रमी नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांची संख्या ३९ लाख १७ हजार ७०१ झाली असून राज्यात सर्वाधिक आहे. तसेच वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढवून प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील १२४ कोटींची थकबाकी २०२४-२५ अखेर ६९ कोटींवर आणली आहे. गेल्या दोन वर्षांत ६२ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजचोरी उघडकीस आल्या आहेत.

 

 

यामुळेच गेल्या दोन वर्षांत वितरण हानीमध्ये ०.३६ टक्के, लघुदाब वीजहानीत ०.९६ टक्के तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानीमध्ये ०.३२ टक्के घट झाली आहे. सद्य:स्थितीत पुणे परिमंडळाच्या तांत्रिक व वाणिज्यिक हानीचे प्रमाण ७.६९ टक्के आहे. परिणामी महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल २१ हजार २८० कोटी रुपयांवर गेला असून दोन वर्षांमध्ये त्यात तब्बल ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. यासह पुणे परिमंडळाने सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये भरारी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी एकूण ९ हजार ९७७ ग्राहकांकडे छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता २४९ मेगावॅट होती. यंदा मार्चअखेर २८ हजार ६०४ ग्राहकांकडे ही क्षमता राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅट झाली आहे. राज्यात छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत पुणे परिमंडळाचा सर्वाधिक १५ टक्के वाटा आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here