सांगलीतील संजयनगरमधील दोन सदनिकांची कडीकोयंडे कापून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी दिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केला आहे. दिवसाउजेडी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलीसही चक्रावले असून सराईत चोरट्यांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचा तपास पथकाचा अंदाज आहे.
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या या दोन घटना शुक्रवारी दुपारीच घडल्या असून या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन पाटील यांच्या सदनिकेचा कडी कोयंडा कापून घरातील तिजोरीचे लॉकर तोडून ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १९ ग्रॅम वजनाचे चांदीचे अलंकार आणि १७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. तसेच लगतच असलेल्या अक्षय सदनिकेतील ज्योती मनसुखलाल चौहान यांच्या सदनिकेतही याच पद्धतीने चोरट्यांनी चोरी करून ३४ ग्रॅमचे सुवर्णालंकार आणि २७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न श्वा७न पथकाच्या माध्यमातून केला. मात्र, हे पथक घटनास्थळीच घुटमळले. आजूबाजूच्या चलचित्रीकरणाच्या माध्यमातून चोरट्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता दोघेजण मोपेडवरून आल्याची माहिती मिळाली असून या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.