
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
वित्त विभागाने गेल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय, तसेच आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला. त्यावरून शिरसाट यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यास ठाम विरोध करत ते म्हणाले, फेब्रुवारीत जेव्हा लाडक्या बहिणींसाठी निधी कपात करण्याबाबतची फाइल माझ्याकडे आली होती, तेव्हा आपण निधी कपात करू नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. माझ्या खात्याकडे ३ हजार कोटींचे दायित्व आहे. अशा वेळी खाते चालवणे मुश्कील होईल.