
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
महाराष्ट्रात पावसाने प्रचंड कहर माजवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. आज (९ जुलै) रोजीही हवामान विभागाने पुढील २४ तास धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील ११ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून, एनडीआरएफ व एसडीआरएफच्या टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोकणात रेड अलर्टचा इशारा
कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा जोर वाढलेला असून, नागरिकांनी किनाऱ्याच्या दिशेने जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर
नागपूरसह संपूर्ण विदर्भ पावसाने झोडपून काढला आहे. नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हाधिकारी विपीन ईटकर यांनी लष्कराची मदत घेण्याची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत ४० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने हाय अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, नद्या, नाले भरून वाहत असल्याने पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.