नाटकाद्वारे हिंदू संस्कृतीचा अनादर केल्याबद्दल आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना ठोठावला 1.2 लाख रुपयांचा दंड

0
6

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ने संस्थेच्या वार्षिक परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलमध्ये ‘राहोवन’ नावाचे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. भारतीय महाकाव्य ‘रामायण’ वर आधारित असलेल्या या नाटकाद्वारे प्रभू रामाचा अपमानास्पद आणि हिंदू संस्कृतीचा अनादर केल्यांचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे. या नाटक आणि त्यातील आशया बद्दल सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची दखल घेत आयआयटी प्रशासनाने सात विद्यार्थ्यांवर ही कारवाई केल्याचे समजते.

केवळ दंडच नव्हे तर, इतरही कारवाई
प्रतिष्ठित संस्था आयआयटीच्या एका सेमिस्टरच्या शिकवणीइतकाच मोठा दंड व्यतिरिक्त, या नाटकात सहभागी झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांना जिमखाना पुरस्कारांमध्ये कोणतीही मान्यता मिळणार नाही. त्यांच्या कनिष्ठांनाही प्रत्येकी 40,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांना वसतिगृहाच्या सुविधांपासून बंदी घालण्यात आली आहे.

हिंदु संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
आयआयटी मुंबईच्या विविध विभाग आणि शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांनी 31 मार्च रोजी सादर केलेले ‘राहोवन’ नाटकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असताना वादाचे केंद्र बनले. या व्हिडिओंमध्ये सीता आणि लक्ष्मण या पात्रांमधील संभाषणावर प्रेक्षक मोठ्या आवाजात प्रतिक्रिया व्यक्त करताना आढळतात. या नाटाकावर भाष्य करताना समिक्षकांनी मुख्य पात्रांना नकारात्मक पद्धतीने साकारल्याचे आणि हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.
शिस्तपालन समितीकडून कारवाई

तक्रारींच्या अनुषंगाने, आयआयटी बॉम्बेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक शिस्तपालन समिती स्थापन केली. या समितीने नाटकातील विद्यार्थ्यांना बोलावून चर्चा आणि चौकशी केली. त्यानंतर सखोल विचार केल्यानंतर, समितीने दंड आणि इतर शिस्तभंगाच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, समितीच्या निर्णयावर भाष्य करताना विद्यार्थ्यांच्या समर्थकांनी म्हटले की, हे नाटक आदिवासी समाजाचे स्त्रीवादी विवेचन आहे आणि त्याला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. असे असतानाही संस्थेने शिस्तभंगाची कारवाई केली. दरम्यान, आयआयटी बॉम्बेने विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेल्या दंडावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे राज्य आणि देशाच्या सांस्कृतीक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईबद्दल संमिश्र भावना पाहायला मिळत आहे. काही मंडळींना झालेली कारवाई योग्य असल्याचे वाटते तर काहींनी मात्र त्या विरोधात भावना व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा सूरही उमटू लागला आहे.