
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वरळी येथील परिवहन विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एका अनोळखी व्यक्तीनं मेसेज पाठवून ही धमकी दिली आहे. त्यात त्यानं म्हटलं की तो सलमानला त्याच्या घरात घुसून त्यावा मारेल आणि त्याची गाडी बॉम्बने उडवेल.
या धमकीनंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत त्या अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्यासोबत तपास सुरू केला आहे. याआधीही सलमानला अशा अनेक धमक्या मिळाल्या होत्या, पण चौकशीत असं समोर आलं होतं की काही लोक हे मेसेज मजेमजेत पाठवत होते. तरीही परिवहन विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या या मेसेजवर पोलीस यावेळी कोणत्याही प्रकारे या प्रकरणाला सहज घेणार नाही, तर ते याविरोधात कठोर कारवाई करणार आहेत.
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेन्टवर गेल्या वर्षी अर्थातच आजच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता. म्हणजेच नेमक्या एका वर्षानंतर पुन्हा धमकीचा प्रकार समोर आला आहे. 2024 मध्येही सलमानला अनेक अनोळखी लोकांकडून धमक्या मिळाल्या होत्या. हे पाहता पोलिसांनी सलमानच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ केलं आणि त्याला Y+ सुरक्षा दिली. त्याची गाडीही बुलेटप्रूफ करण्यात आली आहे.
सलमान खानला लॉरेंस बिश्नोई गँगकडून धोका असल्याचं सांगितलं जातं. या गँगनेच मागच्या वर्षी त्यांच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. काळ्या हरिणाच्या खटल्यात कोर्टानं सलमानला निर्दोष ठरवलं असलं, तरी बिश्नोई गँग त्याला माफी मागायला सांगत आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘मृत्यू कधी येणार हे आधीच लिहिलं गेलं आहे. कोणी धमकावलं म्हणून काही होणार नाही.’