
माणदेश एक्सप्रेस/आटपाडी : राजे, महाराजे तसेच मिसाइल डागणाऱ्यांना मी घरी बसवले असल्याने माझ्या बदनामीचे विरोधकांनी रचलेले षड्यंत्र त्यांच्यावर उलटविले, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
आटपाडी येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, विश्वनाथ मिरजकर, जगन्नाथ कोळपे, यू. टी. जाधव, उदय शिंदे, सयाजीराव पाटील, जयवंत सरगर, महादेव पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी गोरे म्हणाले की, सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. तो का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही; मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये, असे त्यांनी आवाहन केले.
आमदार पडळकर म्हणाले, सांगली जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टुडी यांनी सुरू केलेला मॉडेल स्कूलचा उपक्रम शासनाने स्वीकारला आहे. मात्र, त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाला विविध कल्पना, प्रयोग, प्रकल्प सुचवणे गरजेचे आहे.