
माणदेश एक्सप्रेस न्यूज | दिल्ली
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सध्याच्या घडामोडींवर परखड भूमिका मांडली. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या टीकेला त्यांनी ठणकावून प्रत्युत्तर दिलं. “गद्दारांना मी किंमत देत नाही. त्यांच्या मालकांना ते भेटायला आले असतील, तर त्यावर मी काय बोलणार?” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
शिंदे म्हणाले – बाळासाहेबांचा विरोध, उद्धव म्हणाले – विचारच मूळापासून गढूळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत असताना विधान केलं की, “बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध करणाऱ्या मार्गावर उद्धव ठाकरे गेले आहेत. आम्ही लोककल्याणकारी मार्गाने जात आहोत.” या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,
“त्यांचे विचार महत्त्वाचे नाहीत. ते गद्दार आहेत. गद्दारांना मी किंमत देत नाही. आम्ही आमचा मार्ग स्वच्छ आणि स्पष्ट ठेवला आहे.”
राज ठाकरेंबाबतही स्पष्टता
राज ठाकरे आणि संभाव्य युतीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं,
“राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमचं बघतो. आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत. तिसऱ्याची गरज नाही.”
त्यांच्या या विधानाने आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-शिवसेना युतीच्या शक्यता आणखी बळकट झाल्या आहेत.
केंद्र सरकारवर परराष्ट्र धोरणाबाबत घणाघात
उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेने भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले यावर भाष्य करताना ते म्हणाले,
“ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडाच — देशाचं सरकार चालवतंय कोण?”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की,
“हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. अमेरिका डोळे वटारते आणि मोदी चीनकडे धाव घेतात. चीनलाही काहीतरी ‘नवीन डोअर’ उघडण्यासाठी भेट दिली जाते.”
‘प्रचार मंत्री’ नव्हे, ‘पंतप्रधान’ हवा — पहलगाम हल्ल्यावरून टोला
उद्धव ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका यावरही तीव्र टीका केली.
“शिवसेनेच्या वर्धापन दिनी मी म्हटलं होतं — देशाला सध्या संरक्षण, परराष्ट्र, गृहमंत्री आणि पंतप्रधान अशा चार खऱ्या जबाबदार व्यक्तींची गरज आहे. मात्र, सध्या जे आहेत ते ‘प्रचार मंत्री’ आहेत. पहलगाममध्ये हल्ला झाला, आणि मोदी बिहारमध्ये प्रचार करत होते. देशाचे पंतप्रधान असते, तर ते घटनास्थळी गेले असते,” असं ठाकरे म्हणाले.
राजकीय तणावाला नवे परिमाण
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यांमुळे आगामी काळात महाविकास आघाडी, शिवसेना (ठाकरे गट), मनसे, आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील शब्दयुद्ध आणखी तीव्र होत असून, आगामी निवडणुकांसाठी हा कल सत्तासमीकरणे ठरवणारा ठरू शकतो.