‘मी सात-आठवेळा आमदार, जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे’-अजित पवार

0
224

 

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार आहेत का, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे.

मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी जय पवार बारामतीमधून लढण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळलेली नाही. अन्यथा अजितदादा एरवी रोखठोक उत्तर देऊन मोकळे होतात. पण अजितदादांनी बारामती विधानसभेचा निर्णय जनतेवर सोडून भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री आणि माझ्यात वाद नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, या बातम्या धादांत खोट्या आहेत. आमच्यात कुठलाही वाद आणि मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने सरकार चालवत आहोत. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला एकत्र जाऊन आलो. विरोधकांकडे सध्या टीकेसाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असेल तर आम्ही त्यावर काही करु शकत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.