हैद्राबाद गॅझेट बंजारांसाठी लागू करा; आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने संपवलं जीवन

0
109

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | धाराशिव :
राज्यात मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असताना आता बंजारा समाजानेही त्याच धर्तीवर आरक्षणाची मागणी सुरू केली आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे एक तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पवन गोपीचंद चव्हाण (वय 32, रा. नाईक नगर, मुरूम) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत “हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे” अशी मागणी केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पवन गोपीचंद चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजचा बी.कॉम पदवीधर होता. बेरोजगार अवस्थेत असतानाच तो बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सक्रियपणे काम करीत होता. काही दिवसांपूर्वी तो जालन्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलन संपवून कालच तो नाईकनगर, मुरूम येथे घरी आला. आज (शनिवार) सकाळी तो पुन्हा आंदोलनासाठी जाण्याची तयारी करत होता. मात्र, अचानकपणे त्याने राहत्या घरातील बांबूला गळफास लावून आत्महत्या केली.


घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पवनच्या खिशातून एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने स्पष्ट शब्दांत लिहिले होते की, “हैद्राबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे”. त्याचप्रमाणे समाजाच्या भावी पिढ्यांनी चांगले शिक्षण घेऊन जगात उभे राहावे, यासाठी आरक्षण हा हक्काचा अधिकार असल्याचेही त्याने नमूद केले.


पवनच्या आत्महत्येमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. नातेवाईकांनी स्पष्ट केले की, पवनने बंजारा समाजाच्या आरक्षणासाठीच हे टोकाचे पाऊल उचलले. समाजाच्या हक्कासाठी हा बलिदान व्यर्थ जाऊ नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.


या घटनेनंतर बंजारा समाजात संतापाचे वातावरण आहे. समाजातील नेते आणि युवकांनी राज्य सरकारकडे तातडीने हैद्राबाद गॅझेटच्या धर्तीवर बंजारांना आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन पेटेल, असा इशारा दिला आहे. आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय व सामाजिक पातळीवर तापलेला असताना आता बंजारा समाजाच्या मागणीमुळे सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.


या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र आत्महत्येमागील कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी सापडल्याने बंजारा समाजातील असंतोष आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळेच पवनने हा निर्णय घेतल्याची खात्री नातेवाईकांनी व स्थानिकांनी व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here