माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : तीन वर्षांपूर्वी पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्याअंतर्गत धनगाव येथील गणपत दाजी पवार (वय ५०) यांनी दारू प्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून डोक्यात कोयता आणि काठी घालून पत्नीचा खून केला होता. या खटल्यात विट्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी पती गणपत पवार यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पलूस तालुक्यातील धनगाव येथील सदाशिव भिमराव चव्हाण यांच्या पडीक शेतजमिनीत असलेल्या कॅनॉलजवळील झोपडीमध्ये गणपत पवार आणि त्यांची पत्नी कांताबाई पवार राहत होते. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ४ च्यापूर्वी गणपत पवार याला पत्नी कांताबाई हिने दारूला पैसे दिले नाही. त्यामुळे चिडून गणपत याने तिचा खून केला होता.
याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गणपत पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संशयित गणपत पवार हा ७ ऑक्टोबर २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत होता. हा खटला विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि.१९) झाली. विटा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी गणपत पवार यास सीआरपीसी २३५ (२) अन्वये दोषी धरून कलम ३०२ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून व्ही. एम. देशपांडे यांनी काम पाहिले.