“आम्ही चित्रपटात काही गोष्टी दाखवलेल्या नाहीत. तुम्ही आनंद दिघे यांना कशाप्रकारे त्रास देत होता, हे जर लोकांसमोर आणलं तर लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत”, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटातील डायलॉगमुळे सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
“धर्मवीर 2 या चित्रपटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहेत, भंपक आहेत. आपल्या खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ असेल, ‘द ताश्कंद फाइल्स’ असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आता या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाष्य केले.
“…तर लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत”
“आम्ही चित्रपटात काही गोष्टी दाखवलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला आहे, हे जर लोकांसमोर आणलं तर लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत. संजय राऊत यांनी दिघे साहेबांची एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना ताडा लागला. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला”, असे नरेश म्हस्के म्हणाले.
“संजय राऊत दिघे साहेबांचा तिरस्कार करायचे”
“संजय राऊत हे नेहमी दिघे साहेबांचा तिरस्कार करायचे. मातोश्रीमध्ये तेल टाकण्याचे काम ते करायचे. काही गोष्टी आमच्या मुठीत आहेत, त्या उघडायला लावू नका”, असा इशारा नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला.
“मातोश्रीमध्ये दिघे साहेबांचे कौतुक कधीही झालं नाही”
“मातोश्रीमध्ये दिघे साहेबांचे कौतुक कधीही झालं नाही. फक्त निवडणुकीला त्यांचं नाव घेतात. आनंद दिघे गेल्यानंतर त्यांचा स्मृतिदिन गडकरी सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्यावेळेला मातोश्रीमधून फोन करून तो कार्यक्रम रद्द केला गेला”, असा गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
“तसेच ठाण्यातील गडकरी नाट्यगृहाला आनंद दिघे यांचा नाव द्यावा, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यालाही मातोश्रीवरुन विरोध करण्यात आला. दिघे साहेबांचं काम जगाला दाखवण्याचा काम एकनाथ शिंदे करतात. ती गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. त्यांनी युतीमध्ये निवडणूक लढली आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ते काँग्रेस बरोबर जाऊन बसले”, असेही नरेश म्हस्के यांनी म्हटले.