मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पोलीस दलाची ताकद किती वाढेल?; बेरोजगार तरुणांचे स्वप्न साकार होणार का?

0
95

माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई –

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून, लवकरच भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत गृह विभागाने मांडलेला प्रस्ताव एकमुखाने मंजूर झाला.


मंत्रिमंडळाचे चार महत्त्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ पोलीस भरतीलाच मंजुरी मिळाली असे नाही, तर विविध क्षेत्रांशी संबंधित आणखी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

  1. महाराष्ट्र पोलिस दलात १५,००० नव्या पदांसाठी भरतीला मंजुरी – या भरतीमुळे पोलीस दलाची मनुष्यबळाची कमतरता दूर होईल आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीस हातभार लागेल.

  2. रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ – सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य वितरणासाठी दुकानदारांना मिळणारे प्रति क्विंटल ₹१५० मार्जिन वाढवून ₹१७० करण्यात आले.

  3. सोलापूर–पुणे–मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding – या तीन शहरांदरम्यान हवाई सेवेला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

  4. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्ज योजनेत शिथिलता – विविध महामंडळांच्या कर्ज योजनेतील जामीनदार अटी शिथिल करून शासन हमीची मुदत पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली.


रास्त भाव दुकानदारांसाठी मोठा दिलासा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांना ₹१५० प्रति क्विंटल ऐवजी ₹१७० प्रति क्विंटल मार्जिन मिळेल. ही वाढ ₹२० प्रति क्विंटल असून, यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे ₹९२.७१ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल.
गेल्या अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांकडून या वाढीची मागणी होत होती. विविध बैठका घेऊन सरकारने ही मागणी मान्य केली आहे. या निर्णयामुळे दुकानदारांना आर्थिक बळकटी मिळेल आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता सुधारेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.


२०२२–२३ च्या भरतीची प्रगती

अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस दलाने २०२२–२०२३ सालच्या १७,४७१ पदांपैकी ७० टक्के भरती प्रक्रिया फक्त दोन महिन्यांत पूर्ण केली आहे.

भरतीची पदनिहाय माहिती:

  • पोलीस शिपाई: ९,५९५ पदे

  • चालक पोलीस शिपाई: १,६८६ पदे

  • बॅण्डस्मन: ४१ पदे

  • सशस्त्र पोलीस शिपाई: ४,३४९ पदे

  • कारागृह शिपाई: १,८०० पदे

या पदांसाठी १६,८८,७८५ अर्ज प्राप्त झाले होते. १९ जून २०२४ पासून राज्यभर मैदानी चाचण्या, कौशल्य चाचण्या व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आल्या. आतापर्यंत ११,९५६ उमेदवार निवडून त्यांना नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.


रोजगाराच्या संधी आणि कायदा-सुव्यवस्था दोन्हींसाठी सकारात्मक पाऊल

नव्या १५,००० भरतीची घोषणा ही राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी ठरणार आहे. सध्या राज्य पोलिस दलावर वाढत्या कामाचा ताण आहे. नव्या भरतीमुळे गस्त वाढविणे, गुन्हेगारीवर नियंत्रण, तसेच ग्रामीण भागातील पोलीस उपस्थिती वाढविणे शक्य होईल. त्याचबरोबर, हवाई सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि सामाजिक न्यायाच्या कर्ज योजनांवरील निर्णयही विविध घटकांना लाभ देणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here