
माणदेश एक्सप्रेस|पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळी प्रकरणात फरार असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे याला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे सांगत पक्षाने या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण मनाला क्लेशदायक आणि चीड आणणारे आहे. तिच्या मृतदेहावरील जखमांचे व्रण पाहता आत्महत्या की हत्या — याचा निष्पक्ष तपास होणे अत्यावश्यक आहे. तिच्यावर अमानुषपणे मारहाण झाली हे स्पष्ट दिसून येत आहे.”
सुळे यांनी या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. आजच्या काळातही जर हुंडाबळीसारख्या घटना घडत असतील, तर त्या आपल्या समाजासाठी लज्जास्पद आणि धक्कादायक आहेत,” असे त्या म्हणाल्या.
“या प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग ती कुणीही असो — कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. वैष्णवीला न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.