
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शुक्रवारी सकाळी घडलेली एक भीषण घटना सर्वत्र खळबळ उडवणारी ठरली आहे. काळाचौकी परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न करत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काळाचौकीतील आस्था नर्सिंग होम परिसरात ही घटना घडली. स्थानिकांच्या मते, एक तरुण एका तरुणीच्या मागे लागलेला दिसत होता. तरुणी त्याच्यापासून सुटण्यासाठी रस्त्यावरून धावत नर्सिंग होममध्ये शिरली. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत आत प्रवेश केला आणि तिथेच चाकू काढून तिच्यावर वार केले.
जखमी तरुणीला तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले, मात्र हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळीच स्वतःचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुण आणि जखमी तरुणी या दोघांचीही ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेतले असून, तरुण-तरुणीमध्ये काही संबंध होते का?, एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला का?, या दिशेने तपास सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून, हल्ल्याचा अचूक क्रम समजून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य संस्थेजवळ, आणि पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त व प्रतिसाद यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
महिलांवरील अत्याचार, पाठलाग, आणि धमकावणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अनेक सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले. अनेकांनी पोलिसांना अशा घटनांवर कठोर पावले उचलण्याची मागणी केली. “दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर महिलांनी सुरक्षिततेसाठी काय करावं?” असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला.
काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब घेतला जाणार आहे. पोलिसांनी या घटनेमागचा अचूक हेतू शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि पोलिस तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


