
पाचव्या शतकातील आरमार पुन्हा सज्ज – जगातील एकमेव जहाजाचा नौदलात समावेश
माणदेश एक्सप्रेस न्यूज| नवी दिल्ली : भारताच्या नौदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आज भारतीय नौदलात असे खास जहाज सामील होणार आहे, जे जगात कुठल्याही देशाकडे नाही. हे जहाज ५व्या शतकातील प्राचीन भारतीय आरमाराचे प्रतीक असून, हे आरमार किती समृद्ध व सामर्थ्यशाली होते याचे जिवंत उदाहरण ठरणार आहे.
प्राचीन तंत्रज्ञानातून साकारलेले जहाज
हे जहाज शेकडो वर्षांपूर्वीच्या भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. केरळमधील कुशल कारागिरांनी लाकडी फळ्या आणि नारळाच्या काथ्याचे दोर वापरून हे जहाज तयार केले आहे. खास बाब म्हणजे, हे जहाज कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पारंपरिक पद्धतीने बांधले गेले आहे.
‘अजिंठा’ची प्रेरणा, ‘भारत’ची शान
या जहाजाचा मूळ ढाचा कुठेच उपलब्ध नसल्यामुळे याची रचना अजिंठा लेण्यांतील चित्रांवरून केली गेली आहे. प्रसिद्ध जहाज निर्माता बाबू शंकरण यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
त्रिपक्षीय करारानंतर सुरुवात
जुलै २०२३ मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि होडी इनोव्हेशन्स यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. त्यानंतर या जहाजाच्या बांधणीस सुरुवात झाली. ‘आझादी का अमृत महोत्सव’चा भाग म्हणून हे ऐतिहासिक जहाज नौदलात औपचारिक समारंभात समाविष्ट करण्यात येणार आहे.
नाव अनावरण आणि पुढील मोहिम
कारवार येथील नौदल तळावर आज या जहाजाचे नाव जाहीर केले जाईल. नंतर हे जहाज गुजरातहून ओमानकडे आणि नंतर जगभर प्राचीन जलमार्गांवर भ्रमंतीसाठी पाठविले जाणार आहे.
भारताच्या आरमाराचा ऐतिहासिक ठसा
हे जहाज केवळ एक नौका नाही, तर भारतीय आरमाराची संस्कृती, परंपरा आणि नौदलीय पराक्रमाची जिवंत ओळख आहे. आजपासून भारताकडे असे जहाज असणार आहे जे जगात कुणाकडेच नाही – ही गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची बाब आहे.