
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींना तब्बल १७ वर्षांनी निर्दोष मुक्त करण्यात आले. या निकालावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, “हिंदू कधीच देशविघातक कृत्य करत नाही, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, पण न्याय उशिरा का होईना मिळाला,” असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्वप्रथम मी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. उशिरा का होईना, या लोकांना न्याय मिळाला. त्या काळात यूपीए सरकार होतं. देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवले जात होते, त्यात हजारो निरपराध लोकांचे बळी गेले. त्यावेळी या सरकारने ‘दहशतवादाला कुठलाही रंग नसतो’ असं म्हणताच, मालेगावनंतर ‘भगवा दहशतवाद’ असं लेबल लावलं.”
“हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काँग्रेसने केलं”
या निकालामुळे काँग्रेसच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश झाला असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. “भगव्याला बदनाम करण्याचं काम यूपीए सरकारने केलं. हिंदुत्वाला कलंकित केलं. आज न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे,” असे शिंदे म्हणाले.
त्यांनी विचारले की, “या सगळ्या घटनांना ‘भगवा दहशतवाद’ असं नाव कोणी दिलं? काँग्रेसने. तेव्हा देशभरात दहशतवादाचा कहर होता, पण जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हा शब्द गढवला. आजचा निकाल दाखवतो की, हिंदू समाज सहिष्णू आहे, आणि त्याला खोट्या आरोपांनी झाकून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.”
“हा अन्याय हिंदू जनता विसरणार नाही” – भावनिक प्रतिक्रिया
शिंदे यांनी स्पष्ट केले की, “कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि इतरांनी जे मानसिक, सामाजिक आणि शारीरिक छळ सहन केला, तो विसरणं अशक्य आहे. हा अन्याय संपूर्ण हिंदू समाजाच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. आज निर्दोष मुक्तता झाली, पण ती १७ वर्षांनी! हा कालखंड या देशभक्तांसाठी यातनादायी होता.”
“हिंदू दहशतवाद” हा एक भंपक प्रचार
शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत आणखी सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले,
“हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूंसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ हा भंपक शब्द काँग्रेसच्या षड्यंत्रकारी नेत्यांनी गढवला. आज त्याच षड्यंत्रावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. हे एक काळंकुट्ट पर्व संपलं. आता ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा नव्या आत्मविश्वासाने दुमदुमेल.”
शेवटी शिंदे म्हणाले, “सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!”