
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– “हिंदीची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. राज्याच्या मातृभाषेवर आघात करण्याचा हा प्रकार त्वरित थांबवला गेला पाहिजे,” असा तीव्र इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात येणार असल्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला धारेवर धरले.
राज ठाकरे म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही, ती काही निवडक राज्यांची भाषा आहे. महाराष्ट्रात ती सक्तीने शिकवावी हा प्रयत्न राज्य सरकारचा आहे की काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा, हे स्पष्ट व्हायला हवं. IAS अधिकाऱ्यांना मराठी वाचावी लागू नये म्हणून हा डाव आखण्यात आला आहे का?”
“हिंदीच का सक्तीची?”
“गुजरात, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? इथल्या मुलांवर लहान वयातच हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारनेही शैक्षणिक धोरणात स्पष्ट केलं आहे की प्रत्येक राज्याने आपली भाषा, संस्कृती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. मग राज्य सरकार असा निर्णय कशाच्या आधारावर घेत आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, “ही फक्त भाषेची नाही तर अस्मितेची लढाई आहे. भाषा कुठलीही चांगली असते, पण मराठीला बाजूला सारून हिंदी लादली जाणार असेल, तर ती मुळातच अमान्य आहे. हजारो वर्षांची संस्कृती, साहित्य, इतिहास असलेली मराठी भाषा एकीकडे नामशेष करण्याचा डाव रचला जातोय. हे महाराष्ट्राच्या जनतेने थांबवले पाहिजे.”
जनतेला आणि पालकांना आवाहन
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि पालकांना आवाहन केलं की, “ही केवळ शाळेतील अभ्यासक्रमातील बाब नसून आपल्या संस्कृतीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं आणि या निर्णयाविरोधात आवाज उठवावा.”