
पुणे | प्रतिनिधी
मुंबई व पुणे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे व एसटी सेवांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. या गाड्या मुंबईहून पुण्याकडे न आल्याने बुधवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी नियोजित वेळेच्या गाड्यादेखील रद्द झाल्या. त्यामुळे रोजंदारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड फटका बसणार आहे.
रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने गाड्या रद्द
मुंबईत जोरदार पाऊस व त्यानंतर रेल्वेमार्गावर साचलेले पाणी यामुळे दुपारनंतरच लोकल व एक्स्प्रेस सेवा विस्कळीत झाल्या. मुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्स्प्रेसही रद्द कराव्या लागल्या.
यामुळे मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक गाड्या पनवेल किंवा पुण्यात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. कोयना आणि उद्यान या गाड्यांचा यामध्ये समावेश होता. बुधवारी सकाळी या गाड्या पुन्हा नियोजित वेळेत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
डेक्कन क्वीनचा अर्धवट प्रवास
मंगळवारी सकाळी डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या नियोजित वेळेनुसार पुण्यातून सुटल्या होत्या. मात्र, मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गाड्यांना उशीर झाला आणि सायंकाळी त्या पुण्याकडे परतवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी या गाड्यांचा पुण्यातून होणारा प्रवास रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
याचा परिणाम म्हणून मुंबई-पुणे मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या हजारो नोकरीधारक प्रवाशांना फटका बसणार आहे.
एसटी सेवांवरही पावसाचा फटका
केवळ रेल्वेच नव्हे, तर पावसाचा परिणाम एसटी बससेवांवरही झाला आहे. पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ई-शिवनेरी बस दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना ताटकळत बसस्थानकांवर थांबावे लागले.
पुण्यातून नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या मार्गांवरील इतर बसगाड्याही वाहतूककोंडी व पावसामुळे उशिरा धावत होत्या. काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला, परंतु त्यासाठी जादा दर आकारण्यात आल्याचे दिसून आले.
वाहतूककोंडी आणि पाणी साचल्याने वाढला प्रवासाचा त्रास
पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. काही भागांमध्ये झालेल्या वाहतूककोंडीमुळे एसटी बस व खासगी वाहतूक दोन्हीही प्रभावित झाली. प्रवासाला लागणारा वेळ दुप्पट वाढल्याने प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागला.


