
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे आभार मानले. अर्थसंकल्प सादर करताना ज्याप्रमाणे त्यांनी काव्यांचा आधार घेतला होता, त्याचप्रमाणे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतानाही त्यांनी काव्यांजली सादर करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“अनेक राजकीय व्यक्तींनी, कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण तज्ज्ञांनी अर्थसंकल्पाची दखल घेतली. त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली. कोणताही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूने बोललं जातं. विरोधक त्यावर टीका करत असतात. राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा हा अनुभव आहे. अर्थसंकल्पाच्या स्वागताचं आणि कौतुकाचं प्रमाण वेगवेगळं मिळालं. त्यामुळे आम्हाला काम करताना ऊर्जा मिळते”, असं अजित पवार म्हणाले.
“महायुतीच्या सदस्यांनी कौतुक करणं मी समजू शकतं. कारण ते आमच्या सरकारमधील पाठिंबा देणारे घटक आहेत. पण भास्कर जाधव आणि इतर सदस्यांनीही कौतुक केलं. त्यांनी खरोखर कौतुक केलं की त्यापाठीमागे काही वेगळी भावना आहे? पण यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेला आहे. जयंतराव सध्या इथं नाहीयत. तेही नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून उपरोधिकपणे झालर देण्याचा प्रयत्न करतात. सर्व मंत्र्यांना आता अजित पवारांना शरण गेल्याशिवय पर्याय नाही, असं ते म्हणालेत. ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात, तेव्हा बाकीच्या मंत्र्यांनी त्यांना शरण जायचं असतं का? त्यामुळे अशा शब्दांचा उल्लेख करणं बरोबर नाही. आम्ही नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सर्व सांगतात की आमच्यात एकी आहे, वाद नाहीयत. वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काहीही अर्थ नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ‘बडा घर पोकळ वासा’, ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ असंही काहीजण म्हणाले.
काही लोकांनी अर्थसंकल्प विचार करून सादर केलेला व संतुलित आहे, अशीही प्रतिक्रिया दिली. माझा उत्साह वाढवणाऱ्यांसाठी मला एकच म्हणावंसं वाटतं…
ऐकल्या, शिव्या दुनियेच्या,
जाहली, जरी बदनामी,
हे काय, कमी मजसाठी
मी तुम्हा, आवडलो आहे!
अशी चारोळी अजित पवारांनी सभागृहात ऐकून दाखवली. त्यांच्या या चारोळीवर अनेकांनी मनमुराद दादही दिली.(स्त्रोत-लोकसत्ता)