विमान अपघातातून वाचलेला “तो” एकमेव प्रवासी; पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

0
355

माणदेश एक्सप्रेस न्यूज|अहमदाबाद – देशाला हादरवून टाकणाऱ्या एअर इंडिया विमान अपघातात चमत्कार घडला आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेले बोईंग 787 ड्रीमलाइनर (AI-171) विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. या भयंकर दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २५ स्थानिक रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या संपूर्ण दुर्घटनेत रमेश विश्वास नावाचा एक ब्रिटीश प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला आहे.

 

विमान कोसळताना रमेश विश्वास हे एका विशिष्ट क्षणी इमारतीवर धडकण्याच्या वेळेस विमानातून खाली पडले आणि त्यांचा जीव वाचल्याचं बोललं जात आहे. दुर्घटनास्थळी भीषण स्फोट झाला आणि विमानात मोठी आग लागली होती, त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले.

 

 

रमेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी लंडनमध्ये हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं की, “तो कसा वाचला, हे त्यालाही समजलेलं नाही, पण त्याचा जीव वाचला, यामुळे आम्ही थोडं आश्वस्त आहोत.”

 

 

रमेशच्या भावाचा – अजय विश्वास – याचा देखील या विमानात समावेश होता. मात्र त्याच्या बाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. रमेशचा लहान भाऊ नयन विश्वास म्हणाले, “रमेशशी अपघातानंतर बोलणं झालं, पण अजयचा काहीही थांगपत्ता नाही. आम्ही भारतात येत आहोत, आशा आहे अजयबद्दलही काही चांगली बातमी मिळेल.”

 

 

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन रमेश विश्वास यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला जखमींच्या उपचारात कसूर होऊ नये, असे निर्देश दिले. मृतांच्या ओळखी पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

 

या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, तसेच राष्ट्रपतींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एअर इंडियाने मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here