
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परिसरातील भादोले गावात सोमवारी रात्री एक भयानक निर्घृण हत्याकांड उघडकीस आले. आरोपी पतीने पत्नीची क्रूर हत्या केली, त्यानंतर गावात जाऊन खुनाची कबुली दिली आणि फरार झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात घडलेल्या या घटनेत आरोपी प्रशांत पाटील यांनी त्यांच्या पत्नी रोहिणी पाटील यांची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आधी रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली, आणि नंतर कोयत्याने सपासप वार करत तिचा जीव घेतला. हा प्रकार सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजता घडला.
घटनेनंतर प्रशांत गावात जाऊन स्थानिकांना “मी खून केला, मुलींवर लक्ष ठेवा” असे सांगून तो तिथून फरार झाला. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आणि रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले.
माहितीनुसार, रोहिणी व तिचा पती मुलींसह भादोले येथे राहायचे. मात्र, रोहिणीच्या वडिलांना काही आरोग्य समस्या असल्याने गेल्या आठवडाभरापासून ते दोघे सांगली जिल्ह्यातील वडगाव येथील माहेरात ये-जा करत होते. सोमवारी संध्याकाळी दोघे भादोले येथील घराकडे परत येत होते.
मोटारसायकलवरून जात असताना कोरेगाव-भादोले रस्त्यावरील झुंजीनाना मळ्याजवळ आरोपीने अचानक रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली. बेसावध असलेल्या रोहिणीवर हातातील कोयत्याने सपासप वार केले, ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि घटनास्थळीच ठार झाली.
वडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तत्काळ पोलिसांनी शोधकार्य करून आरोपीला अटक केली. आरोपीचे फिर्यादीवरून तपास सुरू असून, गुन्ह्याचा नेमका तपशील, आरोपीची मानसिक अवस्था आणि घटनाक्रम याबाबत पोलिस अधिक माहिती गोळा करत आहेत.
हा भयानक प्रकार समोर आल्याने कोल्हापूर शहर आणि हातकणंगले परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांना मदतीसाठी पुढे येण्याची विनंती केली आहे.