
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानावरून राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, मराठा समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईत मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात प्रचंड गर्दी झाली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांनी रात्री गाड्या हलवल्या असल्या तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील.
ते म्हणाले,
“सरकार कितीही भीती दाखवो, आम्ही मागे हटणार नाही. मी मेलो तरी आझाद मैदानातून जाणार नाही. काय व्हायचे ते होऊद्या.”
“याचे दुश्परिणाम देवेंद्र फडणवीस आणि मराठे जाणतील. मराठे काय असतात हे पुन्हा साडेतीनशे वर्षांनी दाखवावे लागेल.”
सरकारवर टीका करताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
त्यांनी म्हटले की –
“फडणवीस न्यायदेवतेला खोटी माहिती देतात.”
“त्यांनी आम्हाला परवानग्या दिल्या नाहीत, भाकरी-पाणी दिलं नाही, सतत त्रास दिला.”
“त्यांच्या चुकीमुळे हे आंदोलन पेटले आहे.”
मनोज जरांगे यांनी सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “30 ते 35 मंत्री येऊ नयेत. फक्त दोन मंत्री आले तरी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यांचा आम्ही सन्मान करू.”
जरांगे पाटील पुढे म्हणाले की,
“कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायचा नसतो. पण सरकार सतत खोड्या घालते.”
“शनिवार-रविवारी मराठ्यांची पोरं मुंबईत प्रचंड संख्येने दिसतील. त्यांना कोणीही अडवू शकत नाही.”
सध्या मराठा उपसमितीची बैठक सुरू असून, या बैठकीतून आंदोलनाचा पुढील मार्ग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.