मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचे ते फोटो आधी पाहिलेले का? ; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले…

0
535

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : ‘सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात कोणताही हस्तक्षेप नव्हता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यातील फोटो उघड झाले आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत मी सीआयडीकडे कोणतीही माहिती मागितली नाही आणि त्यातील फोटोही पाहिलेले नाहीत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच फोटो पाहिले,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला.

 

 

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना देशमुख यांच्या हत्येबाबत व्हायरल झालेले फोटो दोन महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी आपण तपासात हस्तक्षेप केला नसल्याचे स्पष्ट केले. ‘काही मंडळींना यंत्रणा समजत नाहीत. ज्या वेळी ही घटना घडली, त्यानंतर मी सीआयडी चौकशी जाहीर केली. या प्रकरणात कसलाही हस्तक्षेप नसेल, तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा, असे मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलिट केलेले, हरवलेले मोबाइल शोधले. तसेच त्यांनी त्यातील संपूर्ण डेटाही शोधला. त्यामुळे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाहीत, तर ते आरोपपत्रातीलच आहेत. सीआयडीच्या कामात कुणाचा हस्तक्षेप केला नाही. ज्या दिवशी आरोपपत्र दाखल झाले, त्यावेळी मला तपासाबाबत कळले. पण तोपर्यंत मी एकदाही सीआयडीला कुठलीही माहिती मागितली नाही. मी फोटोही पाहिले नाहीत,’ असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आरोपपत्र दाखल झाल्यावरच मी फोटो पाहिले’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

 

 

‘देशमुख यांची ज्याप्रकारे हत्या झाली आणि फोटो बाहेर आले, तसेच हत्येचा मास्टरमाइंड मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. महायुतीचे सरकार असल्याने निर्णय घ्यायला उशीर होतो. पण आम्ही हे सर्व प्रकरण ठामपणे हाताळले’, असेही त्यांनी सांगितले. ‘धनंजय मुंडे यांच्या इथे बैठक झाली, मुंडेंनी कारवाईत हस्तक्षेप केला असा एक जरी पुरावा सीआयडीला मिळाला असता तर कारवाई केली असती; पण माझ्या माहितीनुसार अशी बाब नाही. कोणत्याही खटल्याची कारवाई ही भावनेवर नाही तर ठोस पुराव्यांवर चालते. त्यामुळे कोणताही आरोपी सुटणार नाही. अत्यंत कठोर शिक्षा केली जाईल,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here