मुंबईच्या सत्तेसाठी मराठी विरुद्ध गुजरातीची लढाई सुरू झाली का?; ठाकरे बंधूंचं टार्गेट काय?

0
93

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवी कलाटणी मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या व्यापारी मंडळाचे टार्गेट मुंबई आहे. त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे. मात्र, ठाकरे बंधूंचे टार्गेट हेच आहे की मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, ती कायम मराठी माणसांकडेच राहिली पाहिजे. हेच आमचे अंतिम लक्ष्य आहे.”


मनसे-शिवसेना युती जमणार का?

मुंबई, ठाणे, कल्याण महापालिकांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेमध्ये एकत्र लढण्याबाबतची चर्चा रंगात आली आहे. राऊत म्हणाले, “बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. नाशिकमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार असून त्यातही मनसे शिवसेनेसोबत असेल. निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चाही सुरू आहे. मुंबई हेच आमचे प्रमुख लक्ष्य आहे.”


मुख्यमंत्रीपद लॉटरीने की मटक्याने ठरलं?

भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ‘लॉटरी’ हा शब्द वापरला होता. त्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकारने लॉटरी योजना चालवल्या. पण आज राज्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असूनही हा मटका चालतोय. मुख्यमंत्रिपदासाठी लॉटरी नव्हे तर मटका लागला असावा. मात्र मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार-चार मटके एकाच वेळी चालतात.”


सत्ता गेली तर महाजनांची अवस्था काय होईल?

गिरीष महाजन यांनाही राऊतांनी लक्ष्य केले. ते म्हणाले, “महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळते आहे हे आधी त्यांनी पाहावे. ज्या दिवशी त्यांच्या हातातून सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांची काय अवस्था होईल, हे त्यांना समजेल. ठाकरे बंधू उद्या पुन्हा एकत्र आले तर भाजप-शिंदे गटाला हादरे बसतील. आज फडणवीसांच्या भोवती जे चोर-दरोडेखोर फिरत आहेत, त्यांना उद्या सत्तेवरून पायउतार झाल्यावर रस्त्यावर फिरणेही अवघड होईल.”


ठाकरे-मनसे युतीमुळे मुंबईतील सत्तासमीकरण बदलणार का?

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. “मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे” या विधानामुळे ठाकरे गटाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये आपली रणनीती स्पष्ट केली आहे. दुसरीकडे भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल करून त्यांनी राजकीय वातावरण तापवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here