
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना उबाठा नेते अन् खासदार संजय राऊत हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. कधी शिवसेनेत एकत्र असणाऱ्या या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कठोर प्रहार करण्यात येतो. रविवारी शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ट्रम्प यांना मध्यस्थीचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. त्यांना शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले, बेलाज, बेशरम जो माणूस असतो ना…तो या प्रकारच्या गोष्टी करत असतो. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर विचारणारे तुम्ही कोण आले. तुम्ही तुमची मध्यस्थी मातोश्रीवर करा. इकडे मध्यस्थी करू नका, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
पाकिस्तानने केलेल्या शस्त्र संधीच्या उल्लंघनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. ते म्हणाले, आपण कोण बोलत आहोत. कोणावर बोलत आहोत. तुम्ही साधे नगरसेवक तरी झाला आहात का? आमदारांच्या मतावर तुम्ही खासदार झालात आहात. आज काय परिस्थिती आहे. देशाच्या बाजूने उभे राहण्याची आज वेळ आहे. परंतु आपल्याच घरातील लोक पंतप्रधान यांच्यावर टीका करत असतील तर देशाची परिस्थिती काय होईल?.त्याचा विचार राऊत यांनी करावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी त्यांना दिला.