
माणदेश एक्सप्रेस न्यूज| कराड – छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
कराड येथे माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती आहे. ही पदे लवकरात लवकर भरली जावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर लवकरच निर्णय घेतील, अशी आमची अपेक्षा आहे.”
दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रीपद देणे ही चूक असल्याचे मत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जरांगे त्यांचे मत मांडत आहेत.”
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत विरोधकांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, “अजित दादांचे बीडकडे चांगले लक्ष आहे. त्यांनी जबाबदारीने काम सुरू केले आहे.”
दिल्लीतील कामकाजाबाबत विचारले असता, “मीही आता दिल्लीत चांगला रुळलोय,” असे मिश्किल उत्तर देत तटकरे यांनी शरद पवारांच्या अनुपस्थितीवर थेट काही बोलणे टाळले.
शिराळा मतदारसंघाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हेही यावेळी उपस्थित होते. त्यांच्याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, “नाईक यांचाही आमच्या पक्षात योग्य सन्मान ठेवला जाईल.”