राजकीय वर्तुळात खळबळ : सांगलीत जीएसटी विभागाचा छापा

0
317

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) गुप्तचर संचालनालयाने (DGGI) एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर छापे घालत मोठी कारवाई केली. बोगस बिलांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा संशय व्यक्त होत असून या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


सांगली मुख्य रस्त्यावर संबंधित पदाधिकाऱ्याचा व्यवसाय असून, येथेच जीएसटी गुप्तचर संचालनालयाचे कोल्हापूर पथक गुरुवारी सकाळपासून दाखल झाले. व्यवसायातून कथितरीत्या बनावट बिले दाखवून व्यवहार वाढविण्यात आल्याची माहिती केंद्रीय यंत्रणेला मिळाल्यानंतर ही कारवाई उभी राहिली. पथकाने दिवसभर दस्तऐवज, संगणकीय नोंदी तसेच व्यवहारासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे तपासली.


फक्त व्यवसायापुरते मर्यादित न राहता, या जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी देखील छापे टाकण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान काही महत्वाची कागदपत्रे आणि नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र याबाबत अधिकृतपणे जीएसटी विभागाने कोणतीही माहिती दिलेली नाही.


व्यवसायातील खऱ्या उलाढालीपेक्षा जास्त आकडे दाखवण्यासाठी बोगस बिलांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. प्राथमिक चौकशीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ही कारवाई कोणाच्या व्यवसायावर झाली, कोणत्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर संशय आहे, याची चर्चा गुरुवारी सायंकाळपासूनच राजकीय वर्तुळात रंगली होती. शहरातही व्यापारी वर्ग, व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांमध्ये या कारवाईबाबत मोठी कुजबुज सुरू होती.


केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाने अद्याप या धाडसत्राबाबत अधिकृत निवेदन केलेले नाही. मात्र, कारवाई दरम्यान जप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here