
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड :
बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. लोकप्रिय नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद बर्गे यांनी ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु त्यांच्या नातेवाईकांचा मात्र ठाम आरोप आहे की ही आत्महत्या नसून घातपात असू शकतो.
गोविंद बर्गे हे विवाहित असून पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. साधारण वर्षभरापूर्वी पारगाव कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिची त्यांना ओळख झाली. ही ओळख हळूहळू प्रेमसंबंधात बदलली. या नात्यात असतानाच पूजाने गोविंदकडून दागिने, मोबाईल, महागडे खर्च तसेच सासुरे गावातील घराच्या बांधकामासाठी पैसे घेतले. इतकेच नाही तर गेवराईतील बंगल्यावर आणि बर्गेंच्या नावावर असलेल्या पाच एकर जमिनीवरही तिची नजर असल्याची माहिती समोर आली आहे.
पूजाच्या मागण्या आणि धमक्या वाढू लागल्या. मागण्या मान्य केल्या नाहीत तर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिल्याचे गोविंद यांच्या जवळच्या मित्रांकडून स्पष्ट झाले आहे. या दबावामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते आणि कोणाशीही नीट संवाद साधत नव्हते.
सोमवारी गोविंद बर्गे हे पूजाच्या सासुरे गावात गेले. तिथे पूजा घरी नव्हती, परंतु तिच्या आईशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आईकडूनही त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
याच वेळी संतापलेल्या आणि खचलेल्या अवस्थेत गोविंद यांनी पूजाच्या आईच्या घरासमोरच मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा कॉल व्यर्थ गेल्याने त्यांचा संताप आणि नैराश्य आणखी वाढला.
यानंतर ते कारमध्ये बसून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच गावापासून काही अंतरावर त्यांची कार उभी असताना पोलिसांना मिळून आली. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले गोविंद मृतावस्थेत सापडले. त्यांच्या डोक्यात गोळी आरपार गेली होती.
या संपूर्ण घटनेत सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे गोविंद बर्गे यांनी केलेला शेवटचा व्हिडीओ कॉल. त्यांनी पूजाला फोन करून आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्याचा आणि टोकाचं पाऊल उचलू नका असा संकेत देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जर त्या क्षणी पूजाने किंवा तिच्या कुटुंबीयांनी प्रतिसाद दिला असता, त्यांना थांबवलं असतं, तर कदाचित गोविंद यांचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा स्थानिकांमध्ये जोर धरत आहे.
या घटनेत नातेवाईक आत्महत्या मानण्यास तयार नाहीत. “त्यांच्या हातात साधी काठी नसते, तर पिस्तुल कोठून आणले? त्यांना आत्महत्येपर्यंत कोणी ढकलले?” असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट पूजावर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. तिच्या जबाबातून अनेक महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या हा प्रकार नेमका प्रेमातून उद्भवलेला तणाव, ब्लॅकमेलिंग आणि धमक्या यांमुळे झालेली आत्महत्या आहे की यामागे घातपात आहे, याचा तपास सुरू आहे.