
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बीड –
गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सासुरे गावाजवळ त्यांच्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नातेवाईक व मित्रांनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आहे.
या प्रकरणात नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) हिचे नाव आल्याने प्रकरणाला वळण लागले आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूजावर बर्गे यांना सातत्याने पैशांसाठी व मालमत्तेसाठी ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे.
मित्र व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सतत गोविंद यांच्याकडे मोठ्या मागण्या करत होती. गेवराईतील बंगला तिच्या नावावर करून दे, पाच एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करून दे, असे ती मागत होती. मागण्या मान्य केल्या नाहीत तर दुष्कर्माचा खोटा आरोप करून गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही तिने दिल्याचे सांगितले जाते.
या सर्व दबावामुळे गोविंद बर्गे मानसिकरित्या खचले होते. त्यांनी मित्रांशी अनेकदा आपल्या त्रासाबद्दल बोलून दाखवले होते. “मी खूप निराश झालो आहे,” असे शब्द त्यांनी मित्र चंद्रकांत याच्यासमोर काढल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 5–6 दिवसांपासून गोविंद यांचा मोबाईल बंद होता. त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. या काळात ते मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. “आत्महत्या करण्यासारखे ते व्यक्ती नव्हते, त्यामुळे घातपाताचा संशय आहे,” असे मित्रांनी स्पष्ट सांगितले.
पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे यांनी पूजासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. कलाकेंद्र उभारण्यासाठी, सासुरे गावात घर बांधण्यासाठी, महागड्या वस्तूंसाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. तरीही पूजाच्या मागण्या कमी होत नव्हत्या.
गेल्या वर्षी 2024 मध्ये धाराशिवमधील एका कलाकेंद्रात गोविंद बर्गे व पूजा गायकवाड यांची ओळख झाली. गोविंद विवाहित असून दोन मुलांचे वडील आहेत, हे माहीत असूनही पूजाने त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवले. त्या नात्याचा फायदा घेत तिने वारंवार पैशांचा व मालमत्तेचा तगादा लावला, असा आरोप कुटुंबीय व मित्रांनी केला आहे.
मागण्यांना न जुमानल्याने पूजाने बर्गे यांच्याशी बोलणं बंद केलं. ते मात्र तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. घटनेच्या आधीच्या रात्री ते तिच्या सासुरे गावात गेले होते. मात्र तिथे त्यांच्यात काय संवाद झाला हे अद्याप उघडकीस आलेले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला.
नातेवाईक व मित्रांच्या आरोपामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आत्महत्या की घातपात, याचा खुलासा करणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, पूजाचे कॉल रेकॉर्ड्स यांची तपासणी सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा गूढ उकलण्याची शक्यता आहे.


