
माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नवे राजकीय वादळ उठले आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सांगलीत सोमवारी मोठी सभा आयोजित केली. या सभेत खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांनी भाजपवर जोरदार टीका करत पडळकरांना ताबडतोब आवर घालण्याची मागणी केली.
सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी थेट भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले –
“आम्हालाही शिव्या येतात, पण महाराष्ट्र शिव्यांसमोर नाही, तर विकासाच्या ओव्यांसमोर नतमस्तक होतो. वाचाळवीरांमुळे भाजपची प्रतिमा डागाळत आहे. पडळकर यांचा बोलाविता धनी कोण, हे लोकांना माहित असायला हवे.”
खासदार निलेश लंके म्हणाले –
“वाचाळवीरांचा आका जाती-जातीत भांडणे लावत आहे. अशा लोकांकडे राज्याला देण्यासाठी काहीही नाही. भाजपने समज देण्याऐवजी ताकीद द्यायला हवी. हा संघर्ष भविष्यात त्यांच्यावरच उलटणार आहे.”
माजी मंत्री राजेश टोपे यांनी पडळकरांवर घणाघाती टीका करत म्हटले –
“राज्यात सध्या कंबरेखालील राजकारण सुरू आहे. चांगला माणूस राजकारणात यायला तयार नाही. सगळ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे लागेल. पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षा दिली पाहिजे.”
आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी वक्तव्य करताना म्हटले –
“टीआरपीसाठी नेते काहीही बोलतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा विधानांचा वापर होतो. जनतेने अशा खेळांना बळी पडू नये.”
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनातील घडलेला किस्सा सांगत भाजपावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले –
“माझ्या उद्देशाने चुकीचा आवाज आला म्हणून मी ओरडलो, पण कोणाचेही नाव घेतले नव्हते. तरीही भाजप आमदारांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख थोडक्यात वाचले. अशा लोकांना भाजप विधानसभेत घेऊन आला आहे.”
तसेच त्यांनी पडळकरवाडीतील जमिनीच्या चौकशीवर सरकार मौन बाळगते असा आरोप केला.
युवक नेते रोहित पवार यांनी हल्ला चढवत म्हटले –
“सोन्यासारख्या माणसाबद्दल बेन्टेक्स कार्यकर्ता बोलतो. हे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत. मराठा आरक्षणाचा वाद केंद्र व राज्य एकत्र येऊन सोडवावा. पण निवडणुकीच्या तोंडावर जातीपातीचे प्रश्न पेटवून राजकीय पोळी भाजली जाते.”
सक्षणा सलगर : “पडळकर जे बोलले ते भाजपला मान्य आहे का? जयंत पाटील यांचा विरोधक खानदानी असायला हवा.”
उत्तम जानकर : “आजचा मोर्चा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बंड आहे. जतचं मतदान एकदा मतपत्रिकेवर घेऊन पाहू.”
विक्रम सावंत : “पडळकर यांच्या वक्तव्याचा भाजप नेते निषेध करत नाहीत. अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे.”
मेहबूब शेख : “बीडपेक्षा सांगलीची अवस्था वाईट आहे. आमच्याकडे आमदारामुळे अभियंत्याने आत्महत्या केलेली नाही. पडळकरांचा हॉटेल डेटा काढण्याची वेळ येऊ नये.”
दिलीप पाटील : “माझे कार्यकर्ते पडळकरांचा बंदोबस्त करू म्हणाले होते, पण जयंत पाटील यांचे नाव येईल म्हणून थांबवले.”
या निषेध सभेत आमदार उत्तम जानकर, दिलीप पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, मनोज शिंदे-म्हैसाळकर, सुकुमार कांबळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, देवराज पाटील, संजय बजाज, रिपाईचे सचिन खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. भाजप नेत्यांनी अजूनही याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे “पडळकरांचा बोलाविता धनी कोण?” हा अमोल कोल्हेंचा सवाल अधिक गडद होत आहे.