“जयंत पाटीलांची माफी कशासाठी मागू? – गोपीचंद पडळकरांचा सवाल”

0
485

माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपाच्या आतूनही पडळकरांना फटकारले जात असतानाच आता स्वतः पडळकरांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देत उलट प्रश्न उपस्थित केला आहे.


या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना थेट फोन करून तंबी दिल्याचे समजते. पडळकरांनी स्वतःच हे उघड केले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला. अशाप्रकारची वक्तव्ये करू नका अशी सूचना त्यांनी दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन,” असे पडळकरांनी सांगितले.

मात्र त्याचवेळी पडळकरांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले.

“जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन करून निषेध व्यक्त केला का? जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलले गेले, तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मग मी जयंत पाटील यांची माफी कशासाठी मागू?” असा सवाल त्यांनी केला.


वादग्रस्त विधानावर पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील यांनी फारसं काही बोलण्याचे टाळले.

“मी या विषयावर काही बोलणार नाही,” असे पाटील यांनी थोडक्यात उत्तर दिले.

मात्र त्यांच्या समर्थकांनी सांगलीत पडळकरांविरोधात जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप आमदारांचा निषेध नोंदवला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली.

“पडळकरांनी जे विधान केले ते योग्य नाही. कुणाच्याही वडिलांबाबत अथवा कुटुंबाबद्दल बोलणे चुकीचे आहे. पडळकर हे तरुण आणि आक्रमक नेते आहेत. पण आक्रमकतेतून काय अर्थ निघेल हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना मी स्पष्ट सांगितले आहे की, अशा विधानांचे आम्ही समर्थन करत नाही,” असे फडणवीस म्हणाले.

तसेच,

“शरद पवारांचाही मला या संदर्भात फोन आला होता. मी त्यांनाही आम्ही असे वक्तव्य मान्य करत नाही असे सांगितले,” असे फडणवीसांनी उघड केले.


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनीही भाष्य केले.

“वादग्रस्त विधानांबाबत महायुतीचे धोरण ठरलेले आहे. भाजपच्या संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आहे, परंपरा आहे. कुणीही असो, अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.


पडळकरांच्या विधानामुळे राज्यातील राजकारण अधिक तापले असून भाजपासाठी ही एक अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे फडणवीस यांनी पडळकरांना समज देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर दुसरीकडे पवार गटाचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आता पडळकर यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होते का, की हा वाद काही दिवसांनी शांत होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here