
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या विधानावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला असून महायुती सरकारमध्येही नाराजीचे सूर उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी पडळकरांचे कान टोचले.
गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भाषणादरम्यान त्यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली.
पडळकर म्हणाले –
“अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?”
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला असून भाजपनेही या विधानावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले,
“गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची सध्या माझ्याकडे माहिती नाही. पण मी याच विचाराचा आहे की, कोणताही पक्ष असो… महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना अशा प्रकारची वक्तव्ये करू नये. अशी वक्तव्ये ही वेदना देणारी असतात.”
महायुती सरकारच्या धोरणाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले –
“वादग्रस्त विधानांच्या संदर्भात आमच्या महायुती सरकारचं एक धोरण आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, आमदार किंवा नेता वादग्रस्त विधान करत असेल, तर त्या पक्षाच्या वरिष्ठांनीच भूमिका मांडावी. शिवसेनेतून काही विधान झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. माझ्या पक्षातून काही विधान झालं, तर मी जबाबदारी घेईन. आणि भाजपच्या संदर्भात जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.”
अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आता सर्वांचे लक्ष भाजपकडे लागले आहे. फडणवीस पडळकरांच्या विधानावर काय भूमिका घेतात, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
गोपीचंद पडळकर हे ओबीसी समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याआधीही त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली होती. मात्र यावेळचे वक्तव्य अत्यंत व्यक्तिगत आणि मानहानीकारक असल्याने संतापाचा सुर अधिक तीव्र झाला आहे.
विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला असून “महायुती सरकारचे हे खरे चेहरे आहेत” अशी टीका सुरू झाली आहे. तर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पडळकरांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजित पवारांनी दिलेला इशारा म्हणजे महायुतीतही अस्वस्थता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


