
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सातारा
साताऱ्यातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेडणे (सोन्याचे पारंपरिक दागिने) बनवण्यासाठी दिलेली २ सोन्याची बिस्किटे घेऊन एक बंगाली कारागीर व त्याचे सहकारी अचानक पलायन झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📌 दोन वर्षांपासून होता विश्वासात
फिर्यादी दिनेश दत्तात्रय देशमुख (वय ४४, रा. बसाप्पा पेठ, करंजे, सातारा) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, फसवणूक करणारा मुस्तकीन बंगाली (रा. डफर चौक, लाहाट, पश्चिम बंगाल) हा गेल्या दोन वर्षांपासून सातारा व कोरेगावदरम्यान ये-जा करत सराफ व्यवसायात कारागिरी करत होता. तो दिलेल्या सोन्याचे दागिने वेळेवर तयार करून देत असल्यामुळे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जात होता.
🛑 बिस्किटे घेतली पण दागिने दिले नाहीत
अलीकडेच देशमुख यांनी १५ तोळे वजनाचे दोन सोन्याचे बिस्किटे, एकूण अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचे, वेडणे बनवण्यासाठी मुस्तकीनच्या हवाली केली होती. मात्र काही दिवस उलटून गेले तरी तो तयार दागिने घेऊन परत आला नाही. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो कोरेगावमधूनही गायब असल्याचे लक्षात आले.
🚨 सहा बंगाली कारागीरही गायब
कोरेगावमधून अधिक चौकशी केली असता, मुस्तकीनसोबत आणखी सहा बंगाली कारागीर राहत होते. हे सर्वजण एकाच रात्री गायब झाले असून, ही पूर्वनियोजित फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतर सराफ व्यावसायिकांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.
👮♂️ पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. बंगालमधील मूळ पत्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर शोधमोहीम राबवण्याचे नियोजन असल्याचे समजते.
❗ काय सांगतो कायदा?
भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (अविश्वासाचे उल्लंघन), ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात वारंवार अशा प्रकारे सराफ व्यावसायिकांची फसवणूक होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.