गूडन्यूज! सोने-चांदीत सर्वात मोठी घसरण; 1980 नंतर पहिल्यांदाच असा रेकॉर्ड

0
841

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या भावात मोठी पडझड झाली असून 1980 नंतर पहिल्यांदाच सोन्याने विक्रमी घसरण नोंदवली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि त्यामुळे गुरुवारी सोन्याचे दर एक टक्क्यांनी घसरून 3690 डॉलर प्रति औंसवर आले. तर चांदीतही तेवढीच घसरण होऊन भाव 42 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून सोन्याने जबरदस्त उसळी घेतली होती. जागतिक बाजारात बुधवारी सोने $3,707.57/oz या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पुन्हा दरकपातीचे संकेत दिल्यानंतर बाजारात अस्थिरता वाढली आणि दुसऱ्याच दिवशी सोने घसरले.
या घसरणीनंतरही सोन्याने 45 वर्षांतील रेकॉर्ड मोडला आहे. 2025 या वर्षात सोने आतापर्यंत तब्बल 40 टक्क्यांनी वाढले असून S&P 500 सारख्या मोठ्या इंडेक्सलाही मागे टाकले आहे. 1980 मधील इन्फ्लेशन ॲडजेस्ट रेकॉर्डलाही सोन्याने ओलांडले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून सोन्यात सातत्याने गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक गुंतवणूकदार लखपती, करोडपती तर काही अब्जाधीशही झाले आहेत.


goodreturns.in च्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 54 रुपयांनी घसरून 11,117 रुपये झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10,190 रुपये असून 18 कॅरेट सोने 8,338 रुपये इतके आहे.

दरम्यान, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव असा होता :

  • 24 कॅरेट सोने : ₹1,09,730 प्रति 10 ग्रॅम

  • 23 कॅरेट सोने : ₹1,09,290 प्रति 10 ग्रॅम

  • 22 कॅरेट सोने : ₹1,00,520 प्रति 10 ग्रॅम

  • 18 कॅरेट सोने : ₹82,300 प्रति 10 ग्रॅम

  • 14 कॅरेट सोने : ₹64,190 प्रति 10 ग्रॅम


गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदीने 3 हजार रुपयांची उसळी घेतली होती. त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. परंतु 17 सप्टेंबर रोजी तब्बल 2000 रुपयांची घसरण नोंदली. आज पुन्हा एक हजार रुपयांची पडझड झाली असून goodreturns च्या माहितीनुसार सध्या एक किलो चांदीचा भाव ₹1,31,000 इतका आहे.

IBJA च्या माहितीनुसार एक किलो चांदी ₹1,25,756 इतक्या दराने विकली जात आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कुठलाही कर किंवा शुल्क नसल्याने दर कमी असतात, तर सराफा बाजारात कर व शुल्काचा समावेश झाल्याने भावात तफावत दिसते.


सोने-चांदीतल्या या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांना धक्का बसला असला, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा रेकॉर्ड-ब्रेकिंग कालखंड फायदेशीर ठरला आहे. सोन्याने मागील 45 वर्षांचा इतिहास बदलला असून, चांदीतली हालचालही लक्षवेधी ठरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here